इचलकरंजी / मन्सूर अत्तार :शहरातील लंगोटे मळा कॉर्नर परिसरात शिवशाहीर कै. राजाराम जगताप यांचे तैलचित्र आणि रस्ता नामकरणाचे उदघाटन असा संयुक्त कार्यक्रम आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते पार पडला.
वस्त्रनगरीचे सुपूत्र महाराष्ट्र भूषण शिवशाहीर कै. राजाराम जगताप यांनी आपल्या भारदस्त आवाजाने शिवकालीन इतिहासाला जाग आणत समाजात राष्ट्रप्रेमाचे व समाजप्रबोधन करत शाहीरी कलेचा प्रचार व प्रसार करण्यात मोठे योगदान दिले आहे. शाहिरीच्या माध्यमातून इचलकरंजीसह कोल्हापूर जिल्ह्याचे नांव देशाच्या कानाकोपर्यात पोहचले आहे. त्यांचे समाजप्रबोधनाचे कार्य व योगदान स्मरणात रहावे या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते संजय आरेकर व अशोक कुंभार यांच्या संकल्पनेतून आणि नगरसेवक सागर चाळके यांच्या सहकार्यातून लंगोटे मळा कॉर्नर परिसरात शिवशाहीर कै.राजाराम जगतापयांचे तैलचित्र उभारण्यात आले असून या रस्त्यालाही त्यांचे नांव देण्यात आले आहे. याचे आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते व नगरसेवक सागर चाळके यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळासो कलागते, पुंडलिक जाधव, माजी नगराध्यक्ष राजाराम धारवट, सुभाष शेळके, मदन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी शाहीर विजय जगताप, शाहीर चंद्रकांत जगताप यांच्यासह मान्यवरांनी शिवशाहीर कै. राजाराम जगताप यांच्या कार्याचा आढावा घेत त्यातून समाजासाठी चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. यावेळी मुकुंद काटे राजाराम जगताप यांच्या परिवारातील सदस्य व भागातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय आरेकर, अशोक कुंभार, शुभम आरेकर, विजय चव्हाण, उत्तम चौगुले आदींनी परिश्रम घेतले.