कोल्हापूर: वडणगे तालुका करवीर येथील शिवपार्वती तलावाच्या सुशोभीकरणाचे काम गेल्या दोन वर्षापासून रखडले आहे. या तलावाला राज्य सरोवर संवर्धन योजनेतून 3 कोटी 70 लाख रुपये मंजूर झाले. मात्र राजकीय आरोप-प्रत्यारोप बरोबरच प्रशासकीय दिरंगाईमुळे तलावाचे काम रखडले. पहिल्या टप्प्यात कामासाठी 60 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. दरम्यान नव्याने बांधलेली तलावाची 200 फूट संरक्षण भिंत पावसाळ्यात कोसळली.या तलावाच्या सुशोभीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज गुरूवारी जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात एक विशेष बैठक झाली. या बैठकीला आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार चंद्रदीप नरके उपस्थित होते.
या बैठकीला सुरुवात झाल्यानंतर आमदार पी. एन. पाटील यांनी तलावा बाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. तलावाच्या कामात ठेकेदाराकडून दिरंगाई झाली आहे. ठेकेदाराने 10 टक्के लोकवर्गणी भरली नाही. त्यांनी ती रक्कम भरायला हवी होती. तलावाची भिंत कोसळली याचा अर्थ काय? निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे काय? त्या संदर्भातील चौकशी झाली काय? अशा प्रश्नांचा भडिमार आमदार पाटील यांनी बैठकीत केला. तलावाच्या कामात कुणीही राजकारण करू नये काम तात्काळ सुरू कोणाच्या दृष्टिकोनातून सर्वांचे प्रयत्न असले पाहिजेत असे आमदार पाटील यांनी सांगितले.
या बैठकीला वडणगे गावचे सरपंच सदस्य त्याचबरोबर ग्रामस्थ आले होते त्यांनी ठेकेदाराच्या कामावर नाराजी व्यक्त करत आक्रमक झाले. प्रशासनाला जाब विचारत ग्रामस्थांनी ठेकेदाराचे नाव ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याचा आग्रह धरला. यावर माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले की, काम निकृष्ट दर्जाचे झालेले नाही. ठेकेदाराच्या या कामाची जबाबदारी आपण घेतोय, कामात कोणतंही राजकारण होणार नाही काम चांगलं होईल या तलावाच्या कामासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
या बैठकीतील अंतिम निर्णय असा झाला येत्या पंधरा दिवसात तांत्रिक बदलाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून तो मंजूर करून घ्यायचा आणि ठेकेदाराला काम करण्याच्या सूचना द्यायच्या ठेकेदाराकडून काम सुरू न झाल्यास त्यावर कारवाई करून त्या ठेकेदाराचे नाव ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा बैठकीत निर्णय झाला. याबाबत माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी ही आपली संमती दर्शवली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, समाजकल्याण सभापती कोमल मिसाळ, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक धोंगे तसेच सरदार मिसाळ वडणगे ग्रामपंचायत सरपंच, सदस्य ,शिवपार्वती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.