चंदगड भवन साठी चंदगडच्या जि.प. सदस्यांचे फार मोठे योगदान :ना.हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी एखाद्या विकास कामाच्या बाबत पाठपुरावा केला तर ते काम पूर्ण होतय.चंदगडच्या सदस्यांनी चंदगड भवन उभारण्यासाठी अतिशय तळमळीने प्रयत्न केल्याने आज चंदगड भवन एक सुंदर इमारत साकारली याच आपल्याला कौतुक आहे. यामध्ये चंदगडच्या सदस्यांचं फार योगदान आहे असे गौरवोद्गार ना.हसन मुश्रीफ यांनी काढले. जिल्हा परिषदच्या आवारातील उभारण्यात आलेल्या नव्या चंदगड भवन या इमारतीचे उद्घाटन ना.मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी बोलताना ना.मुश्रीफ म्हणाले की,चंदगड वरून जिल्हा परिषदेच्या कामासाठी येणाऱ्या लोकांसाठी चंदगड भवन मध्ये राहण्यासाठी सोय होणार आहे. यापूर्वी विविध कामासाठी चंदगडहून दीडशे किलोमीटर अंतरावरून जिल्हा परिषद मध्ये येऊन पुन्हा चंदगडला जाण्यासाठी वेळेत एसटी उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे राहण्याची अडचण निर्माण व्हायची. आता चंदगड भवन मध्ये लोकांची राहण्याची गैरसोय होणार नाही. चंदगड भवनचा दुसरा मजला उभारण्यासाठी लागणारा निधी तात्काळ मंजूर केला जाईल अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

चंदगड भवनचा पहिला मजला जि.प.सदस्य कल्लाप्पाणा भोगण व विद्या विलास पाटील यांनी आपल्या निधीतून बांधला आहे.आता सचिन बल्लाळ आणि अनिल सुतार या दोन सदस्यांच्या मार्फत दुसरा मजला उभारला जाणार आहे.पण त्यासाठी माझ्याकडून निधीची तरतूद केली जाईल असे मुश्रीफ यांनी सांगितले.

यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले की,एखाद्या तालुक्यासाठी जि.प.आवारात भवन उभारण्याची संकल्पना राज्यात कोठेही नाही.मात्र, चंदगडच्या जि.प.सदस्यांनी चांगलं कार्य केल आहे. कोल्हापूरचा पालकमंत्री या नात्याने चंदगडकरांना विकास कामासाठी आपल्याकडून निधी दिला जाईल असे पालकमंत्री पाटील यांनी आश्वासन दिले .चंदगडमध्ये एखादा अत्यवस्थ कोरोना रुग्ण असल्यास त्याला कोल्हापूरला आणावे लागत होते. आता राज्यशासनाच्यावतीने चंदगडमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारला जाणार आहे. त्यामुळे चंदगड तालुक्यामध्ये आरोग्याच्या बाबतीत एक चांगली सुविधा निर्माण होईल.

यावेळी आमदार राजेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त करून ज्या सदस्यांनी चंदगड भवनसाठी निधी दिला आहे, त्यांचे आभार मानले.

यावेळी स्वागत करताना जि.प.सदस्य कल्लाप्पाणा भोगण यांनी चंदगड भवनच्या दुसऱ्या मजल्यासाठी निधी देण्याची उपस्थित दोन्ही मंत्र्यांकडे मागणी केली. तसेच चंदगड भवन उभारण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे विशेष आभार मानले.

चंदगड भवन उभारण्यासाठी जि.प.सदस्य कल्लाप्पाणा भोगण व विद्या विलास पाटील यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यापासून ते भवन उभारण्यापर्यंत योगदान दिल्यामुळे चंदगड भवन इमारत साकारली अशी चर्चा उपस्थित जि.प.सदस्यांमध्ये सुरू होती. त्यांच्यामुळेच 39 लाखाची इमारत उभारली गेली. या कार्यक्रमात पालकमंत्री सतेज पाटील यांनी भोगण आणि विद्या पाटील यांचे कौतूक केले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह चव्हाण सर्व पदाधिकारी अधिकारी व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.