गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा येथील गगनगडावरील हजरतवली गैबीसाहेब व श्री विठ्ठलाईदेवीचा उरूस उत्सव गुरुवारी (दि.13) रोजी आहे. या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. कोरोना निर्बंधामुळे यावर्षीचा हा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. उत्सव काळात धार्मिक विधी केवळ दर्गा मुजावर आणि बैतुलमाल कमिटीचे जाफरबाबा सय्यद यांचे उपस्थितीत करण्यात येणार आहे. कोरोनामुळे भाविकांनी गडावर न येता घरातूनच नैवद्य दाखवावा, असे आवाहन देवस्थानचे पुजारी रफिक काझी व फिरोज काझी यांनी यावेळी केले आहे.
उरूस उत्सवाच्या निमिताने गुरुवारी (13) रोजी दुपारी तीन वाजता गलेफ गगनगडावर नेण्यात येणार आहे. रात्री आठ वाजता गलेफ दर्ग्यातील तुरबतीवर निलराजे पंडित बावडेकर व बैतुलमाल कमिटीचे जाफरबाबा सय्यद यांच्या हस्ते अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर श्री विठ्ठलाईदेवीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. तसेच बुधवारी (दि.12) संदल चढविण्यात येणार आहे. तर याच दिवशी मोफत आरोग्य तपासणी शिबीर होणार आहे.
हिंदू मुस्लीम एक्याचे प्रतिक म्हणून या उत्सवाकडे पाहिले जाते. उत्सवाचा मुख्य दिवशी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमासाठी गगनगड देवस्थानच्या वतीने बापूसाहेब पाटणकर, पंत अमात्य बावडेकर सरकार यांच्यासह भाविक या उत्सवासाठी येथे उपस्थिती लावतात. उत्सवाच्या निमिताने गगनगडावरील गैबी दर्गा व विठ्ठलाईदेवीच्या चौथऱ्याची साफसफाई आणि रंग रंगोटी देखील करण्यात आली आहे. शिवाय गैबी दर्ग्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे होणाऱ्या उरूस उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून कोरोनामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीतच हा उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानचे पुजारी रफिक काझी व फिरोज काझी यांनी दिली आहे.