कोल्हापूर जिल्हा शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात अव्वल..

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतल्या गेलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या परिषदेच्या संकेतस्थळावर नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. यामध्ये परंपरेप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याने अनुक्रमे २९.१४ टक्के व २५.१२ टक्के यश मिळवून राज्यात प्रथम स्थान पटकावले आहे.

१२ ऑगस्ट, २०२१ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मुंबई वगळता राज्यात नाव नोंदणी केलेल्या एकूण ३ लाख ८८ हजार ५१५ विद्यार्थ्यांपैकी प्रत्यक्षात ३ लाख ३७ हजार ३७० विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली होती. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील २० हजार २५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यापैकी ५ हजार ८३६ पात्र परीक्षार्थी आहेत. यातील ५९१ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत. राज्याचा शेकडा निकाल १६.९४४ टक्के तर कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल २९.१४ टक्के लागला आहे. या निकालामध्ये औरंगाबाद (२५.४४), बुलढाणा (२४.६१), सिंधुदुर्ग (२१.४१), ठाणे (२१.०२) पुणे (२०.४५) तर सर्वात कमी गडचिरोली (६.५३) निकालाची नोंद झाली आहे.