मुंबई: विलीनीकरणाच्या मागणीसाठी दोन महिन्यांपासून सुरु असलेला संपावर अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही. यामुळे राज्यातील प्रवाशांचे हाल होत आहेत. यावर तोडगा निघेपर्यंत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा यासह एसटीच्या सर्व मुद्यांवर सोमवार १० जानेवारीला सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब, एसटीच्या मान्यताप्त संघटनेसह, एसटीचे अधिकारी असतील. विलीनीकरणाच्या मागणीसाठी तीन सदस्यांची समिती नियुक्ती केली आहे. त्यांच्या जो अहवाल असेल, तो मान्य केला जाईल,अशी भूमिकाही महामंडळाने घेतली आहे. अहवाल येईपर्यंत महामंडळाने कर्मचाऱ्यांना सात हजार रुपयांपर्यंत वेतनवाढही दिली. मात्र सातव्या वेतन आयोगाप्रमाणे किंवा त्याच्या जवळपास जाणारी वाढ देण्याची मागणीही वारंवार होत आहे. संपात सामिल नसलेल्या एसटी कामगार संघटनांनीदेखिल ही मागणी उचलून धरली आहे. शिवाय संपातील कर्मचाऱ्यांवर झालेली कारवाई रद्द करा ही मागणीदेखिल असल्याचे सूत्रांनी सांगितले. एकंदरीत या सर्व मुद्दयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.