सोलापूर : व्याजाच्या पैशात लिहून दिलेले घर सावकाराने परस्पर विक्री केल्याचा मानसिक धक्का सहन न झाल्याने पंढरपुरातील एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
संतोष प्रकाश साळुंखे असं आत्महत्या केलेल्या या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात खासगी सावकारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथील खासगी सावकार शेखर कुंदरकर, सुवर्णा अंकुश बिडकर व अंकुश रामा बिडकर (सर्व रा. अनिलनगर पंढरपूर ) यांच्याकडून संतोष साळुंखे यांनी व्याजाने पैसे घेतले होते. त्यांचे पैसे व्याजासह परत केले होते. तरीही वरील तिघांनी संतोषला व्याजाची जादा रक्कम दे म्हणून मारहाण केली. शिवाय व्याजाच्या पैशात लिहून घेतलेल्या घराची परस्पर विक्री केली. याच मानसिक धक्क्यातून संतोष याने टोकाचे पाऊल उचलले.याप्रकरणी संशयित आरोपी शेखर दत्तात्रय कुंदरकर याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेने पंढरपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.