अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले.
वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये जगाचा अखेरचा निरोप घेतला. आज सकाळी 9 ते 12 पर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पुण्यातील मांजरीच्या बाल सदन संस्थेत ठेवण्यात आले होते. यानंतर दुपारी 12.15 दरम्यान पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार झाले आहेत. नवी पेठेतील ठोसर पागेल येथे महानुभाव पंथाच्या परंपरेनुसार सिंधुताईंवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सिंधुताई सपकाळ यांच्याकडून माईंच्या अंत्यविधी पार पडल्या. त्याआधी त्यांना शासकीय इतमामात सलामी देण्यात आली. महिला पोलिसांनी सिंधुताईंना ही सलामी दिली आहे. यावेळी ममता सपकाळ यांच्या हाती भारताचा तिरंगा सुपूर्द करण्यात आला आहे. यानंतर सिंधुताई यांच पार्थिव महानुभव पंथाप्रमाणे दफन करण्यात आले. सिंधुताईंनी स्थापन केलेल्या सन्मती बाल निकेतनमध्ये सिंधुताईंच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे. अंत्यदर्शनासाठी आलेल्या महिलांना अश्रू अनावर झाले तर अनेकजणी हुंकदे देत रडत होत्या.