राधानगरी येथे गव्याने केलेल्या हल्ल्यात एक शेतमजूर जखमी…

राधानगरी : कोल्हापूर, सांगली, वाई : वाघ आणि बिबटय़ापाठोपाठ आता गव्यांचा मानवी वस्तीतला वावर आणि त्यातून घडणारे संघर्षांचे प्रसंगही आता वाढू लागले आहेत. मंगळवारी एकाच दिवसात सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत गव्यांनी मानवी वस्तीत शिरकाव करण्याची घटना घडली आहे.

यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथे गव्याने केलेल्या हल्ल्यात एक शेतमजूर जखमी झाला आहे. तर सांगलीतील शिराळा तालुक्यात चार ठिकाणी गव्यांचे कळप दाखल झाले. यामध्ये एका ठिकाणी तर हा कळप एका उसाच्या फडात शिरल्याने तेथे दडून बसलेला बिबटय़ा बाहेर आला आणि त्यामुळे बघ्यांची पळापळ झाली. साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये तर मुख्य बाजार पेठेत रानगवा शिरल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने कोणतीही दुघर्टना घडली नसली, तरी नागरिक आणि पयर्टकांतून घबराटीचे वातावरण पसरले.