गोकुळ ठरावावरून चंद्रकांत पाटील-मुश्रीफ यांच्यात भाजप कार्यालयातच जुंपली; ठराव पडताळणीवरून महायुतीत तणाव

कोल्हापूर :गोकुळ दूध संघाच्या ठरावावरून भाजप नेते तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात भाजप कार्यालयातच जोरदार वाद झाला.

 

 

भाजपच्या ठराव संख्येवर महायुतीतील घटक पक्षांनी आक्षेप घेतल्याने ठरावांची पडताळणी सुरू आहे. रविवारी नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयात भाजपने गडहिंग्लज, आजरा आणि हातकणंगले तालुक्यातील ठरावधारकांना बोलावले होते. यावेळी भाजपचे ठरावधारक आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांच्यात वाद झाला.

 

या वादातूनच दोन्ही मंत्र्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. *”कोणाचे किती ठराव आहेत, हे जर तुम्हीच ठरवणार असाल, तर ठराव पडताळणीचा खेळखंडोबा कशाला? सगळं तुम्ही आणि आ. विनय कोरे ठरवा अन् मुख्यमंत्र्यांना सांगा,”* अशा तीव्र शब्दात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांच्यावर नाराजी व्यक्त केली. त्यावर *”ठरावधारक कशाला दाखवता? तुमच्याकडे ठरावांची संख्या किती ते सांगा,”* असे प्रत्युत्तर मंत्री मुश्रीफ यांनी दिल्याचे समजते.

 

ठरावधारक अंगावर धावले, शौमिका महाडिक आक्रमक –

 

पडताळणीवेळी भाजपचे ठरावधारक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या अंगावर धावून गेल्याने गोंधळ उडाला. हा प्रकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोरच घडला. यावेळी माजी संचालिका शौमिका महाडिक यांनी आक्रमक भूमिका घेतली. मंत्री पाटील यांनी शांत करण्याचा प्रयत्न करूनही गोंधळ सुरूच राहिला.

 

या प्रकारावरून मंत्री पाटील यांनी आमदार अमल महाडिक यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आमदार महाडिक यांनी शौमिका महाडिक यांना घेऊन भाजप कार्यालयातून काढता पाय घेतला.

🤙 8080365706