केडीसीसी बँकेकडे ११,१९८ शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे रु. ७४ कोटी जमा        बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न असलेल्या ११,१९८ शेतकऱ्यांचे रु. ७४ कोटी रुपये कर्जमाफीची रक्कम बँकेकडे आज वर्ग झाली. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. दरम्यान, आजतागायत ॲग्रीस्टॅक नसणारे शेतकरी, मयत खातेदार तसेच; वडिलांच्या संमतीने कर्जपुरवठा झालेली मुले यांच्या रक्कमा मिळण्याबाबत मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

 

 

याबाबत अधिक माहिती अशी, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणातून मुक्त करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज डिजिटल पद्धतीने कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा शुभारंभ करण्यात आला. या ऑनलाईन कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. हसन मुश्रीफ हे बैठकीस ऑनलाईन उपस्थित होते.

 

मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये केडीसीसी बँकेने २९,४२९ शेतकऱ्यांची माहिती महाराष्ट्र राज्य सरकारच्या पोर्टलवर अपलोड केलेली आहे. या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफीची एकूण रक्कम रु. २३५ कोटी रुपये होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यातच २३,१३१ पात्र शेतकऱ्यांची यादी केडीसीसी बँकेला प्राप्त झाली आहे. आजअखेर १५,७८३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले आहे. त्यापैकी ११,१९८ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही कर्जमुक्तीची रक्कम जमा झाली आहे. दरम्यान आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या उर्वरित ४,५८५ शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची रक्कम लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होईल. अद्यापही ७, ३४८ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले नाही. त्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे.

 

ॲग्रीस्टॅक नसणाऱ्या व मयत शेतकऱ्यांच्या वारसानाही लाभ द्या- मंत्री  मुश्रीफ

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, आजच्या ऑनलाईन कर्जमाफी लाभ वितरण समारंभातही ॲग्रीस्टॅक नोंदणी नसणारे शेतकरी आणि मयत खातेदारांच्या लाभाबाबत मी मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी केलेली आहे. तसेच; ज्यांच्या नावावर शेतजमीन नाही त्यांनी कुटुंबातील शेतजमीन नावावर असलेल्या शेतकऱ्यांच्या संमतीने पीककर्ज उचल केलेले आहे. काही शेतकऱ्यांनी देवस्थानच्या जमिनीवरही पीककर्ज उचल केलेले आहे. काही शेतकऱ्यांचे वडील मयत झाल्यानंतर अद्यापही सातबारा वारसांच्या नावावर झालेला नाही. अशा शेतकऱ्यांबाबत योग्य तोडगा काढून कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केल्याचेही श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

 

🤙 8080365706