वाठार : पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशोकराव माने शिक्षण समूहास महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती मा. राम शिंदे साहेब यांनी आज सदिच्छा भेट दिली.

यावेळी शिक्षण समूहाचे अध्यक्ष मा. विजयसिंह माने यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
अभियांत्रिकी, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, पॉलीटेक्निक, फार्मसी, नर्सिंग तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या विविध संस्थांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेला अशोकराव माने शिक्षण समूह हा पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक समूह म्हणून ओळखला जातो. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख शिक्षणावर विशेष भर देत ही संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याची दिशा देत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
सभापती राम शिंदे यांनी संस्थेच्या विविध शैक्षणिक विभागांना भेट देऊन आधुनिक शैक्षणिक सुविधा, संशोधन, नवोपक्रम, उद्योगाभिमुख प्रशिक्षण तसेच विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली.
या प्रसंगी अशोकराव माने शिक्षण समूहाचे अध्यक्ष मा. विजयसिंह माने, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. समीर कदम, हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. अशोकराव माने, जिल्हा परिषद कोल्हापूरचे माजी शिक्षण सभापती मा. प्रवीण यादव, संस्थेच्या संचालिका सौ. मनीषा माने, श्री. अमरसिंह पाटील, हातकणंगलेचे माजी सरपंच मा. संदीप कारंडे, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. प्रवीण घेवारी, संचालिका डॉ. संगीता चौगुले तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
