कोल्हापूर : जिल्हा विकास समन्वय व देखरेख समिती अर्थात ‘दिशा’ ची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत केंद्र शासनाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार शाहू महाराज छत्रपती होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, महापौर रूपाराणी निकम, आमदार अमल महाडिक, आमदार अशोक मानेयांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, नगराध्यक्ष, सभापती व समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.
प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जासमिन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
बैठकीत बोलताना प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ समाजातील अंतिम घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचणे हेच सर्वोच्च ध्येय असल्याचे सांगण्यात आले. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून प्रलंबित बाबींमध्ये तातडीने सुधारणा करावी, तसेच प्रत्येक बैठकीत कृती अहवाल अर्थात ATR सादर करावा, असे निर्देश देण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण व गतिमान विकास, केंद्राच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा निर्धार यावेळी लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला.
