कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागात शनिवारी (दि. २७) चार वर्षीय एकात्मिक बी.एस्सी. बी.एड. (ITEP) प्रवेश प्रक्रियेसंदर्भात समुपदेशन सत्र झाले.

इच्छुक विद्यार्थी व पालकांना प्रवेश प्रक्रियेविषयी अचूक, अद्ययावत व सविस्तर माहिती मिळावी, या उद्देशाने या ऑनलाईन समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना ITEP अभ्यासक्रमाचे महत्त्व, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP – 2020) अंतर्गत या अभ्यासक्रमाची उपयुक्तता तसेच शिक्षक, वैज्ञानिक, संशोधक म्हणून उपलब्ध असलेल्या भविष्यातील संधी कमवा व शिका योजना, उच्च शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या पर्याय एनएसएस, एनसीसी, स्पोर्ट्सच्या विविध संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यानंतर बी.एस्सी. बी.एड (ITEP) अभ्यासक्रमाच्या समन्वयक डॉ. रुपाली संकपाळ यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे, गुणवत्ता यादी, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, प्रवेश निश्चितीची पद्धत, शुल्क, वसतिगृह योजना तसेच प्रवेश प्रक्रियेदरम्यान घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही दिली
