कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 च्या निमित्ताने नागरिकांमध्ये योगाचा प्रसार आणि व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि हॅबिल्ड हेल्थटेक प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने एका ऐतिहासिक ऑनलाइन योग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाद्वारे एकाच वेळी जास्तीत जास्त लोकांनी ऑनलाइन योगासने करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा मानस आहे. या जागतिक विक्रमाचा भाग बनण्याची सुवर्णसंधी सर्व नागरिकांना उपलब्ध झाली आहे.
कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे : दिनांक : 14 जून सकाळी 6.15 ते 7.15 वाजता आयुष मंत्रालयाचे अधिकृत युट्युब चॅनेल (ऑनलाइन)
सहभागाची प्रक्रिया : या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 1800-315-7008 या टोल-फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा. मिस्ड कॉल दिल्यानंतर नोंदणी पूर्ण होईल आणि सहभागीस सत्राची लिंक तसेच आवश्यक सूचना संदेश किंवा व्हॉट्सअॅपद्वारे प्राप्त होईल. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रत्येक सहभाग ग्राह्य धरला जावा यासाठी प्रत्येक सहभागीने स्वतःच्या स्वतंत्र डिजिटल उपकरणावरून (मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅबलेट) लॉग-इन करणे अनिवार्य आहे. एकाच स्क्रीनवर अनेक व्यक्तींनी सहभागी झाल्यास तो एकच सहभाग मानला जाईल. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याने स्वतंत्रपणे आपल्या उपकरणावरून सत्रात सहभागी व्हावे.
आपले आरोग्य सुधारण्याबरोबरच देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी, नातेवाईक, मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांनाही या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.
