कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या रासायनिक अभियांत्रिकी विभागात प्रधानमंत्री उच्च शिक्षण अभियान (PM-USHA) योजनेअंतर्गत “पायपिंग व प्रोसेस प्लँट इंजिनिअरिंग: कन्सेप्ट टू कमिशनिंग” या विषयावरील तीन दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल (IIC), एसयूके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन (SUKRDF) आणि शिवाजी विद्यापीठ सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस (SCIIL) यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा दि. ६ ते ८ जून या कालावधीत होणार आहे. ही माहिती रासायनिक अभियांत्रिकी विभागाचे डॉ. प्रवीणकुमार पाटील यांनी दिली.

कार्यशाळेचे उद्घाटन शनिवार, दि. ६ जून रोजी सकाळी ९.१५ वाजता स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या सभागृहात होणार आहे. कार्यशाळेसाठी ३५ वर्षांहून अधिक औद्योगिक अनुभव असलेले आणि आयआयटी मुंबई प्रमाणित पायपिंग अभियंता नितीन जी. नागेश्वर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
रासायनिक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष ज्ञान आणि कौशल्ये मिळावीत, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत तीन दिवसांत एकूण १२ सत्रांद्वारे उद्योगाभिमुख प्रशिक्षण दिले जाणार असून विविध विषयांवरील प्रात्यक्षिके, उदाहरणाधारित सादरीकरणे, प्रश्नमंजुषा, परीक्षा आणि प्रकल्प चर्चांचाही समावेश करण्यात आला आहे. उद्योगाभिमुख कौशल्यविकासाला चालना देणारी ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना प्रक्रिया उद्योगातील संकल्पनेपासून ते कमिशनिंगपर्यंतच्या संपूर्ण अभियांत्रिकी प्रक्रियेची ओळख करून देणारी ठरेल, असा विश्वास डॉ. पाटील यांनी व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, एससीआयआयएलचे संचालक डॉ. सागर डेळेकर तसेच स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्रभारी संचालक डॉ. अजित कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून रासायनिक अभियांत्रिकी विभागाचे डॉ. पाटील व त्यांचे सहकारी समन्वयक आहेत.
