कोल्हापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयान्वये सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अर्ज सादर करण्याची मुदत दि. १ जून २०२६ पर्यंत देण्यात आली होती. तथापि अपेक्षेपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाल्यामुळे इच्छुक बचत गटांना अर्ज सादर करण्यासाठी दि. १७ जून २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांची कमाल किंमत ३.५० लाख रुपये निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी ९० टक्के म्हणजे ३.१५ लाख रुपये शासकीय अनुदान मिळणार आहे. उर्वरित १० टक्के म्हणजे ३५ हजार रुपये लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटाने भरावयाचे आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गट हा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील पुरुष किंवा महिलांचा असणे आवश्यक आहे. बचत गटाची जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा कृषी विभागाकडे नोंदणी झालेली असावी. गटातील किमान ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असणे, सदस्यांचे जातीचे दाखले, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड तसेच अध्यक्ष व सचिव हेही अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असणे आवश्यक आहे.
तसेच बचत गटाचे राष्ट्रीयकृत बँकेत संयुक्त खाते असावे व ते आधार क्रमांकाशी संलग्न असणे बंधनकारक आहे. ताळेबंद प्रमाणपत्रासह सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. उपलब्ध तरतुदीपेक्षा अर्जांची संख्या अधिक असल्यास लाभार्थी निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे.
इच्छुक अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर यांच्या नावे परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि. १७ जून २०२६ अखेर सादर करावेत. अर्ज कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असून मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.
0000
