क्यू.आर. कोड आधारित खत बुकिंग व खरेदी प्रक्रियेबाबत जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न

कोल्हापूर : कृषी विभागाच्या वतीने जिल्हा परिषद येथे क्यू.आर. आधारित खत बुकिंग व खरेदी प्रक्रियेबाबत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विकसित करण्यात आलेल्या “Framework for Fertilizer Sale” या अँड्रॉइड ॲप्लिकेशनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

 

 

 

 

प्रशिक्षणास जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती स्तरावरील कृषी अधिकारी, खत निरीक्षक, कृषी सहाय्यक तसेच प्रत्येक तालुक्यातील प्रातिनिधिक खत विक्रेते उपस्थित होते. यावेळी क्यू.आर. कोडच्या माध्यमातून खत बुकिंग, विक्री व वितरण प्रक्रिया कशाप्रकारे राबविण्यात येणार आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

 

कृषी विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या या अँड्रॉइड ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक व क्षेत्रनिहाय आवश्यक खतांचे आगाऊ बुकिंग करता येणार आहे. शेतकरी आपल्या मोबाईलवरून नोंदणी करून खतांची निवड, खत विक्रेत्यांची निवड तसेच क्यू.आर. कोडच्या माध्यमातून खत प्राप्त करू शकणार आहेत. या ॲप्लिकेशनमुळे खत वितरण प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता येणार असून शेतकऱ्यांना आवश्यक खतांचा पुरवठा वेळेत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

 

प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांची नोंदणी, फार्मर आयडीचा वापर, आधार आधारित प्रमाणीकरण, जमीन व पीक माहितीची नोंद, पीकनिहाय खत निवड, खत बुकिंग, विक्रेता निवड, क्यू.आर. कोड निर्मिती, खत वितरण तसेच तक्रार निवारण प्रक्रिया यांचे सविस्तर प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. याशिवाय खत विक्रेत्यांनी क्यू.आर. कोडच्या आधारे खत विक्री व वितरण प्रक्रिया कशाप्रकारे राबवावी याबाबतही माहिती देण्यात आली.

 

जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर सुशांत लव्हटे, मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर तसेच संभाजी शेणवे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांनी उपस्थित अधिकारी व खत विक्रेत्यांच्या विविध शंकांचे निरसन करून ॲप्लिकेशनच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे तसेच कृषी विकास अधिकारी राजेंद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील खत निरीक्षक, कृषी अधिकारी आणि खत विक्री केंद्रांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. पांगरे म्हणाले, राज्यातील खत वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक, सुलभ आणि परिणामकारक करण्यासाठी शासनाने क्यू.आर. आधारित खत बुकिंग व खरेदी व्यवस्था विकसित केली आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आवश्यक खतांचे नियोजनबद्ध बुकिंग करता येणार असून खत उपलब्धतेबाबत अचूक माहिती मिळणार आहे. तसेच खत वितरण प्रक्रियेवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअरवरून “Framework for Fertilizer Sale” हे अँड्रॉइड ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये नोंदणी करण्याचे व त्याद्वारे खत बुकिंग करून खत खरेदी करण्याचे आवाहन केले. शासनाच्या या डिजिटल उपक्रमाचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध व सुलभ पद्धतीने खत खरेदी करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

कृषी विभागामार्फत येत्या काळात तालुकास्तरावरही जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून क्यू.आर. आधारित खत बुकिंग व खरेदी व्यवस्था यशस्वी करण्यासाठी सर्व शेतकरी, खत विक्रेते व कृषी विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

0000

🤙 8080365706