कोल्हापूर: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रम आगामी २० जून २०२६ पासून सुरू होणार आहे. ही विशेष मोहीम मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी राबविली जात असून, मतदार यादीतून मृत, स्थलांतरित किंवा दुबार मतदारांची नावे वगळणे आणि पात्र मतदारांची नाव नोंदणी करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या प्रक्रियेत मतदार तपासणी आणि प्रत्यक्ष पडताळणीचे काम केले जाणार असून, अचूकतेसाठी वर्ष २००२ ची मतदार यादी आधार मानण्यात आली आहे, तर वर्ष २०२४ ची यादी अंतिम मानून त्याची तुलना केली जात आहे. सक्षम लोकशाहीसाठी अचूक व पारदर्शक मतदार यादी हाच मूलाधार असल्याने या मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन २७४-कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी तथा करवीर उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांनी केले आहे.

या विशेष कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अधिक अद्ययावत व दोषरहित करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्र स्तरावर केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे नियुक्त केलेले बीएलओ अधिकारी सर्व नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन मतदारांच्या माहितीची पडताळणी करण्याचे महत्त्वाचे कामकाज करणार आहेत. त्यामुळे सर्व मतदार बंधू-भगिनींनी आपल्या घरी येणाऱ्या बीएलओ अधिकाऱ्यांना योग्य व अचूक माहिती उपलब्ध करून देऊन प्रशासनास पूर्ण सहकार्य करावे. नागरिकांचे हे सक्रिय सहकार्य शुद्ध, अचूक आणि विश्वासार्ह मतदार यादी तयार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्व नागरिकांनी बीएलओ यांना आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, ज्यामध्ये ‘SIR Mapping’ करिता सन २००२ मध्ये नाव नोंद असलेल्या मतदारांनी आपले नाव सन २००२ साली कोणत्या मतदार संघात, मतदान केंद्रात व अनुक्रमांकावर होते याची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच ज्या लोकांची सन २००२ नंतर मतदार म्हणून नोंदणी झाली आहे, अशा मतदारांनी आपल्या आई-वडिलांचे नाव सन २००२ साली कोणत्या मतदार संघात, मतदान केंद्रात व कोणत्या अनुक्रमांकावर नोंद होते याची माहिती बीएलओ यांना पुरवावी. याचप्रमाणे सर्व विवाहित मुली किंवा सुना यांनी देखील त्यांच्या आई-वडिलांचे नाव सन २००२ साली कोणत्या मतदार संघामध्ये, कोणत्या मतदान केंद्रामध्ये आणि कोणत्या अनुक्रमांकावर नोंद होते, याची सविस्तर माहिती बीएलओ अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देऊन या राष्ट्रीय कार्यात प्रशासनाला सहकार्य करावे.
ooooooo
