यवलुज येथील कोल्हापूर पद्धती  बंधाऱ्याच्या विशेष दुरुस्तीच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता;आ. चंद्रदीप नरके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महत्त्वपूर्ण प्रस्तावाला अखेर मंजुरी

कोल्हापूरजिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील यवलुज येथील कोल्हापूर पद्धती (को.प.) बंधाऱ्याच्या विशेष दुरुस्तीच्या कामासाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांनी तब्बल ₹6 कोटी 93 लाख 92 हजार 557 रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. आमदार चंद्रदीप नरके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

 

 

यवलुज को.प. बंधारा सन १९६५ मध्ये पूर्ण झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून बंधाऱ्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. परिसरातील पावसाची तीव्रता आणि नदीच्या प्रवाहाचा वेग वाढल्याने बंधाऱ्याचे मोठे नुकसान झाले होते. परिणामी बंधाऱ्यात पाणीसाठा राहत नसल्यामुळे यवलुज, पडळ, माजगाव, माळवाडी, खोतवाडी, शिंदेवाडी आदी गावांतील सुमारे 2303 हेक्टर सिंचन क्षेत्रावर परिणाम होत होता.

बंधाऱ्याच्या जीर्ण अवस्थेमुळे तब्बल 51.68 दलघमी पाणीसाठा धोक्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत होता. या पार्श्वभूमीवर नवीन बंधारा उभारण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांकडून सातत्याने होत होती.

आमदार चंद्रदीप नरके यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ तसेच शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत शासनाने विशेष दुरुस्ती अंतर्गत निधीस मान्यता दिली आहे.

या मंजुरीमुळे भविष्यात परिसरातील सिंचन व्यवस्था सक्षम होणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीसाठा वाढून शेती उत्पादनक्षमतेत वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच परिसरातील जलसंधारण आणि भूजल पातळी सुधारण्यासही मोठी मदत मिळणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

आमदार चंद्रदीप नरके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष आभार मानले

🤙 8080365706