दूरशिक्षण प्रसारासाठी समन्वयकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. कृष्णा पाटील

कोल्हापूर: दूरशिक्षणाची संकल्पना समाजातील सर्व घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अभ्यास केंद्र समन्वयकांनी सक्रिय पुढाकार घ्यावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. कृष्णा पाटील यांनी केले.

 

 

 

 

 

शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील ८९ अभ्यासकेंद्रांतील समन्वयक व लेखनिकांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेश प्रक्रियेबाबत आज ऑनलाइन कार्यशाळा घेतली. त्यावेळी अध्यक्षपदावरुन ते बोलत होते.

 

कार्यशाळेत बी.ए., बी.कॉम., एम.ए. (मराठी, हिंदी, इंग्रजी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास), एम.कॉम., एम.एस्सी. (गणित), एम.बी.ए. तसेच ऑनलाइन एम.बी.ए., एम.एस्सी. (गणित) व एम.कॉम. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यशाळेस उपकुलसचिव व्ही. बी. शिंदे, सहायक कुलसचिव दिलीप मोहाडीकर आदी उपस्थित होते.

 

डॉ. पाटील म्हणाले, शिक्षण अपूर्ण राहिलेल्या तसेच नोकरी करत असलेल्या व्यक्तींना दूरशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध होत आहे. दूरशिक्षण हे कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देणारे प्रभावी माध्यम असून त्याचा अधिकाधिक प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अभ्यासकेंद्र समन्वयकांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

यावेळी डॉ. प्रवीण लोंढे यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करताना आवश्यक बाबींविषयी, डॉ. प्रसाद दावणे यांनी एबीसी-आयडी तयार करण्याबाबत, तर संतोष देवेकर यांनी डीईबी-आयडी तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले.

 

समन्वयक डॉ. चांगदेव बंडगर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. प्रकाश बेळीकट्टी यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सूर्यकांत गायकवाड यांनी आभार मानले.

🤙 8080365706