कागल:कागल शहरात राजर्षी शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शुक्रवारी अत्यंत जल्लोषी वातावरणात स्वागत करण्यात आले. झांझ पथक, लेझीम, धनगरी ढोल, घुमक अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. “राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

कागल शहरातील खर्डेकर चौकात राजर्षी शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असून, त्यासाठी तयार करण्यात आलेला पुतळा शुक्रवारी शहरात दाखल झाला. मिरवणुकीच्या शुभारंभप्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या मिरवणुकीला प्रारंभ झाला . गैबी चौकापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली .
मिरवणुकीदरम्यान पारंपरिक वाद्यांच्या तालावर उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. तसेच मुस्लिम समाज व मागासवर्गीय संघटनेच्या वतीने रूह अफजा वाटप करण्यात आले, संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शहरातील मुख्य बाजारपेठेत ठिकठिकाणी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यावर नागरिकांनी पुष्पवृष्टी केली .
यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, पंचायत समिती सभापती सुवर्णा पाटील, नगराध्यक्षा सविता माने, अखिलेश घाटगे, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, चंद्रकांत गवळी, सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे चेअरमन नवीद मुश्रीफ, प्रवीण काळबर, रणजीत पाटील, दिपक मगर, राजेंद्र जाधव, अमित पिष्टे, सतीश घाडगे, अरुण गुरव, संजय चितारी, नवल बोते, अस्लम मुजावर, नवाज मुश्रीफ, मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्यासह नगरपालिकेचे सर्व नगरसेवक नगरसेविका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
चौकट
राजर्षी शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा अत्यंत सुबक, देखणा आणि आकर्षक पद्धतीने साकारण्यात आला असून, पुतळ्याची भव्यता सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी कलात्मक रचना करण्यात आल्याने नागरिकांकडून पुतळ्याचे विशेष कौतुक होत आहे. पुतळ्याच्या आगमनानंतर अनेकांनी त्यास अभिवादन करून समाधान व्यक्त केले.
राजर्षी शाहू महाराज यांच्यावर आधारित सजीव देखावे शहरातील विविध शाळांच्या माध्यमातून आकर्षक पद्धतीने साकारण्यात आले होते. सामाजिक समता, शिक्षण प्रसार व बहुजन कल्याणाचा संदेश देणारे हे देखावे नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत होते.
