जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

कोल्हापूर: जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने 11 ते 20 मे या कालावधीत छत्रपती शिवाजी स्टेडियम, कोल्हापूर येथे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दररोज सकाळी 6 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत चालणार आहे.

 

 

 

या शिबिरामध्ये योगा, ॲथलेटिक्स, व्हॉलीबॉल, कुस्ती, जलतरण, हॉकी, फुटबॉल, मल्लखांब, जिम्नॅस्टिक, ज्युदो, लाठी-काठी तसेच एरोबिक्स या विविध क्रीडा प्रकारांचे मूलभूत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तज्ञ प्रशिक्षकांकडून प्रात्यक्षिकांसह खेळांचे कौशल्य शिकवून सराव घेतला जाणार आहे.

याशिवाय, खेळाडूंना आवश्यक असणाऱ्या आहारविषयक मार्गदर्शनासोबतच फिजिओथेरपी व प्रथमोपचार याबाबत तज्ञ व्यक्तींची व्याख्यानेही आयोजित करण्यात येणार आहेत. शिबिरासाठी 8 ते 16 वयोगटातील प्रथम नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून, सहभागी खेळाडूंना अल्पोपहार व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी स्टेडियम, कोल्हापूर येथे राज्य क्रीडा मार्गदर्शक रवीभूषण कुमठेकर, सीमा पाटील व अनिकेत बोडके यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.
0000

🤙 8080365706