कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त लंडन येथील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट’ संग्रहालयातून भारतात आणलेल्या ऐतिहासिक ‘वाघनखांचे’ दर्शन आता शिवप्रेमींना ४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत घेता येणार आहे. कोल्हापूर येथील प्रदर्शनाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून शासनाने या प्रदर्शनाच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रदर्शनाचे ठिकाण आणि वेळ
महाराष्ट्र शासनाने हे ऐतिहासिक अमूल्य वाघनख तीन वर्षांच्या मुदतीसाठी करारावर भारतात आणले आहेत. सध्या हे प्रदर्शन कोल्हापुरातील राजर्षी शाहू छत्रपती महाराज जन्मस्थळ संग्रहालय (लक्ष्मी विलास पॅलेस), कसबा बावडा येथील अस्थायी दालनात सुरू आहे. सुधारित अंतिम तारीख ४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत असून प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५:३० पर्यंत आहे.
दर सोमवारी प्रदर्शन नागरिकांसाठी बंद राहणार आहे. सातारा आणि नागपूर येथील यशस्वी प्रदर्शनानंतर, कोल्हापुरातही हे प्रदर्शन पाहण्यासाठी शिवप्रेमी, शालेय विद्यार्थी आणि पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
शिवशस्त्रशौर्यगाथा – वाघनख या प्रदर्शनाद्वारे हा ऐतिहासिक ठेवा जास्तीत जास्त जनतेला पाहता यावा, हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक उ. शं. सुर्वे यांनी केले आहे.
0000
