कोल्हापूर:कोल्हापूर-महाराष्ट्र पोलीस दलामध्ये अस्थापनावर काम करणाऱ्या अंशकालीन कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरुपी सामावून घ्या, वेतन वाढ करा, आदी मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना अंशकालीन आघाडीच्या शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेवून दिले. यावेळी पोलीस महासंचालक दाते यांनी राज्यातील पोलीस खात्यामध्ये काम करणाऱ्या अंशकालीन कर्मचाऱ्यांचा सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्याचा प्रश्न शासनस्तरावर आहे, त्याचा पाठपुरावा करुन यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही समिती शिष्टमंडळास दिली.

महाराष्ट्र पोलीस दलालीत अस्थापनावर गेल्या 40 वर्षांपासून अंशकालीन कर्मचारी काम करीत आहेत. हे सर्व कर्मचारी कंत्राटी करारावर आहेत. अगदी तुटपूंजा वेतनावर हे काम करतात. गेल्या अनेक वर्षापासून अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासनाने कायमस्वरुपी सामावून घ्यावे, यासाठी पाठपुरावा सुरु आहे. नुकतेच राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना अंशकालीन आघाडीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय माने, प्रदेशाध्यक्ष योगेश पाटील, जिल्हाअध्यक्ष समाधान पाटील, उपाध्यक्ष अशोक लोहार, सचिव अजित लोहार यांनी पोलीस महासंचालक दाते यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अंशकालीन कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे तसेच त्यांची वेतनवाढ करावी, या मागणीचे निवेदन दिले.
