कागल:
पंधरवड्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कागल शहरातील पाझर तलावावरील अकरा नखांच्या कासव धबधब्याचे लोकार्पण झाले. त्यानंतर कागलला पर्यटकांची अलोट गर्दी वाढतच आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागलच्या पाझर तलावाकडे बोटिंग आणि पर्यटनचा मनमुराद आनंद घेण्यासाठी दररोज पंधरा-वीस हजार पर्यटक येत असल्याचेही ते म्हणाले.
व
कागलमध्ये एकता सनगर समाज सांस्कृतिक हॉल लोकार्पण कार्यक्रमात मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. सविता माने होत्या. माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, सणगर समाज हा मोठा आणि प्रभावी समाज असून माझ्या राजकीय व सामाजिक जीवनात या समाजाचे मोलाचे योगदान आहे. आजच्या काळात शिक्षणाशिवाय कोणताही पर्याय नाही. आरक्षणामुळे सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी उपलब्ध होत असून समाजातील मुलांनी चांगले शिक्षण घेऊन उच्च पदांवर पोहोचावे. यासाठी पालकांनी मुला-मुलींवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
ते म्हणाले, गेल्या ३५-४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत दुर्बल व वंचित घटकांच्या उन्नतीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले असून शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या. कागल शहर सर्वांगसुंदर करण्यासाठी सातत्याने काम केले. सुमारे आठ -दहा लाख रुपये खर्चून हा हॉल उभारला आहे. या हॉलचा दुसरा मजला उभारण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. नगरपालिकेने पुढाकार घेऊन हा प्रकल्प पूर्ण करावा, असे आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. तसेच, हॉलमध्ये अभ्यासिका सुरू करावी. आवश्यक पुस्तके व साहित्य फाउंडेशनमार्फत देण्याची ग्वाही श्री. मुश्रीफ यांनी दिली.
कासव आणि भरभराट……
मुश्रीफ म्हणाले, अनेक जण धबधब्याच्या प्रतिकृतीसाठी कासव हाच प्राणी का निवडल्याचे विचारतात. त्यांना मी सांगू इच्छितो, हिंदू धर्म संस्कृतीमध्ये कासव या जलचर प्राण्याला फार मोठे महत्त्व आहे. त्याच्यामुळे भरभराट होते, अशी सर्वांची श्रद्धा आहे. कागल शहराची सगळ्याच अर्थाने आणि विकास कामांमधूनही फार मोठी भरभराट होत आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. समाजाचे अध्यक्ष सदाशिव सनगर, उपाध्यक्ष सनी सनगर, भिकाजी देवकर, अशोक रावण, कोंडीबा सनगर, अॅड. प्रकाश सनगर, सतीश सनगर, विद्यासागर सनगर, विठ्ठल सनगर, सागर सनगर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
