कोल्हापूर:ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबीयांचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांत्वन केले. डॉ पवार -सर यांचे करवीर संस्थापिका महाराणी ताराराणीसाहेब यांचे भव्य स्मारक उभारण्याचे अधुरे स्वप्न आपण पूर्ण करूया. हीच त्यांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल, असे उद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. डॉ. पवार यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असेही ते म्हणाले.

कोल्हापुरातील साने गुरूजी वसाहत येथील डाॅ. श्री. पवार यांच्या घरी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांत्वनपर भेट दिली. डॉ. पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, डाॅ. जयसिंगराव पवार हे एक थोर इतिहास संशोधक होते. त्यांचे वाचन, अभ्यास आणि त्यांनी केलेले संशोधन हे अत्यंत प्रगाढ असे होते. इतिहासातील अनेक महापुरुषांचा खरा इतिहास समाजासमोर आणण्याचा त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे प्रयत्न केला. महाराष्ट्र संपूर्ण देशच एका इतिहास संशोधक, इतिहास तज्ञ आणि खऱ्या इतिहासकाराला मुकला आहे…..!
श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, माझे आणि त्यांचे अतिशय जवळचे ऋणानुबंध होते. सेनापती कापशी ता. कागल येथे उभारलेले महान मराठा योद्धे सरसेनापती संताजी घोरपडे यांचे स्मारक असेल. तसेच; करवीर संस्थापिका महाराणी ताराराणीसाहेब यांचे स्मारक असेल. त्यांचा जाज्वल्य इतिहास समाजासमोर मांडला. सरसेनापती संताजी घोरपडे आणि सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या तेजस्वी शौर्याची मुघलांमध्ये किती भीती होती हा जाज्वल्य इतिहासही त्यांनी मांडला.
त्यांच्या अभ्यास, संशोधन आणि संकल्पनेतून साकारलेला सरसेनापती संताजी घोरपडे यांचा पुतळा व स्मारक तर मराठा इतिहासाच्या तेजस्वी शौर्याचे जिवंत प्रतिकच आहे. करवीर संस्थापिका महाराणी ताराराणीसाहेब यांचा खरा इतिहास त्यांनी मांडला. त्यांचे स्मारक होण्यासाठी त्यांची अतिशय तळमळ होती. महाराणी ताराराणीसाहेबांच्या जीवनावरील पुस्तक प्रकाशनावेळी तशी भूमिकाही त्यांनी मांडली होती. आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वजण सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते मिळून करवीर संस्थापिका महाराणी ताराराणीसाहेब यांचे भव्य असे स्मारक उभे करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
===========
