कागलमध्ये जिजाऊ समितीच्या फन स्ट्रीट उपक्रमास उत्सफुर्त प्रतिसाद;विविध खेळ,कला सादरीकरण व स्पर्धांचा महिलांनी लुटला आनंद

कागल :जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजमाता जिजाऊ महिला समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘फन स्ट्रीट’ कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत विविध खेळ,कला सादरीकरण व स्पर्धांचा मनसोक्त आनंद लुटला.

 

 

येथील खर्डेकर चौकातील श्रीराम मंदिरासमोरील चौकात हा कार्यक्रम पार पडला.शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे व राजे बँकेच्या अध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी नगरपालिकेतील महिला सफाई कामगारांचा प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्याच हस्ते दीपप्रज्वलन करून राजे समरजितसिंह घाटगे यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, “महिला दिनानिमित्त केवळ एक दिवस नव्हे तर वर्षातील प्रत्येक दिवशी महिलांच्या कार्याचा सन्मान झाला पाहिजे.आज महिला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्यांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.महिलांच्या उद्योजकतेस प्रोत्साहन देण्यासाठीच्या राजे बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘राजमाता जिजाऊ महिला बचत गट’ योजनेचा लाभ महिलांनी घ्यावा.”
राजे बँकेच्या अध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे म्हणाल्या,“महिलांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळावी म्हणून राजमाता जिजाऊ महिला समितीच्यावतीने ‘फन स्ट्रीट’ या मनोरंजनप्रधान कार्यक्रमाचे सलग दुसऱ्या वर्षी आयोजन करण्यात आले आहे.महिला सक्षमीकरणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.पुढील महिला दिनापर्यंत स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प करून स्वतःसाठी आनंदाने जगूया.”
कार्यक्रमात झुंबा नृत्य, टॅलेंट हंट सादरीकरण, कला प्रदर्शन, स्ट्रीट रांगोळी स्पर्धा, टॅटू काढणे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स मार्गदर्शन, आर्ट पेंटिंग, मेहंदी तसेच नेल आर्ट अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांना महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी नगराध्यक्षा सविता माने, नगरसेविका,राजे बँकेच्या संचालिका नम्रता कुलकर्णी,राजे बँक व शाहू साखर कारखान्याचे संचालक, नगरसेवक-नगरसेविका तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

छायाचित्र कागल येथे जागतिक महिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ महिला समितीच्यावतीने आयोजित फन स्ट्रीट कार्यक्रमाचे उदघाटन हवेत फुगे सोडून करताना शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे,राजे बँकेच्या अध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे,तसेच त्यांनी नगरपालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मानही केला.

🤙 8080365706