गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती एकत्र लढवणार, विरोधकांच्या दडपशाहीला बळी न पडता जास्तीत जास्त ठराव दूध संस्थांनी भाजपकडे जमा करावेत, खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन*

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळची पंचवार्षिक निवडणूक, यावेळी महायुती म्हणून एकत्र लढवली जाईल. त्यामुळे दूध संस्था चालकांनी, विरोधकांच्या दडपशाहीला बळी न पडता जास्तीत जास्त ठराव महायुतीकडे जमा करावेत, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. जिल्हयातील गोकुळ दूध संस्था चालकांच्या बैठकीत ते बोलत होते.

 

गोकुळ दूध संघात सध्या कार्यरत असणार्‍या संचालक मंडळाची मुदत मे महिन्यात संपत आहे. त्यामुळे एप्रिल मध्येच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. २५ संचालक पदासाठी ही निवडणूक होत असून, जिल्हयातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीपेक्षा गोकुळच्या निवडणूकीला, सहकार आणि राजकीय क्षेत्रात मोलाचे स्थान आहे. त्यामुळे आमदार – खासदारकी नको, पण गोकुळ दूध संघाचा संचालक करा, असा आग्रह अनेकांचा असतो. गोकुळ दूध संघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने जिल्हयात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मोर्चाबांधणी सुरू झाली आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली आणि संचालिका सौ. शौमिका महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत, आज गोकुळ दूध संघाशी संलग्नीत संस्थाचालक आणि ठरावधारकांची बैठक भाजपच्या कार्यालयात झाली. यावेळी बोलताना शौमिका महाडिक यांनी, गेल्या निवडणूकीत गोकुळमधील सत्तेची संधी थोडक्यात हुकली. त्यावेळी झालेल्या चुका सुधारून घेत, आता या निवडणूकीला सामोरं जावूया, असे आवाहन केले. या निवडणूकीत महायुतीचे पॅनेल केले जाईल, असे त्यांनी सांगितले. गाेकुळच्या विद्यमान सत्ताधार्‍यांविरोधात दूध उत्पादक शेतकर्‍यांना अनेक बाबतीत संघर्ष करावा लागला आहे. आता मात्र महायुतीची सत्ता गोकुळमध्ये येईल आणि दूध उत्पादक शेतकर्‍यांना सर्वच बाबतीत अच्छे दिन येतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात खासदार धनंजय महाडिक यांनी, गोकुळ दूध संघाची आगामी निवडणूक भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून एकत्र लढली जाईल, असे स्पष्ट केले. विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत महायुतीला निर्विवाद यश मिळाले, त्याचीच पुनरावृत्ती गोकुळच्या निवडणूकीत होईल, असा विश्‍वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. विरोधकांच्या दडपशाहीला बळी न पडता, जास्तीत जास्त ठराव भाजपकडे जमा करावेत, असे आवाहनही खासदार महाडिक यांनी केले. गोकुळच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे आव्हान अजिबात वाटत नाही. केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता असल्यामुळे, गोकुळच्या निवडणूकीतही महायुतीलाच कौल मिळेल, असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. दरम्यान कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष – उपाध्यक्ष पदासह अन्य पदाधिकार्‍यांच्या निवडीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या चार दिवसात जाहीर करतील, अशी माहिती खासदार महाडिक यांनी दिली. या बैठकीला जिल्हयातील विविध दूध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, माजी आमदार सुरेश हाळवणकर, समजितसिंह घाटगे, अमरिष घाटगे, दिलीप पाटील, स्वाती कोरी, संजय पाटील, उमेश आपटे, नाथाजी पाटील, रवीश पाटील- कौलवकर, आनंद गुरव, भिकाजी जाधव, प्रविणसिंह पाटील, अशोक चराटी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

🤙 8080365706