कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात कोल्हापुरात शाहू मिलची उभारणी केली. काळाच्या ओघात ही शाहू मिल २००३ साली बंद पडली. शाहू मिलच्या मोक्याच्या जागेवर अनेकांनी डोळा ठेवून त्याचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न केला; परंतु कोल्हापूरच्या जागरूक जनतेने तो हाणून पाडला. त्यानंतर सातत्याने शाहू मिलच्या जागेवर शाहू महाराजांचे जिवंत स्मारक उभे करावे, अशी मागणी होत गेली. कोल्हापुरातील छत्रपती शाहू मिल येथील सुमारे २७ एकर जागेत राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी डिसेंबर २०१२ च्या हिवाळी अधिवेशनात मी केली होती. यासह विधीमंडळात राजदंड उचलून या प्रश्नाचे गांभीर्य राज्य सरकारच्या निदर्शनास आणले होते. त्यानंतर तत्कालीन मंत्री महोदय व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत शाहू मिलच्या जागेत राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यास तत्वत: मंजुरी देण्याचे जाहीर केले. परंतु, सदर स्मारक आजतागायत कागदोपत्री राहिल्याने समस्त शाहू प्रेमींमधून नाराजीचा सूर उमटत आहे. समस्त कोल्हापूरवासीयांची एकमुखी मागणी असलेल्या या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी मा.वस्त्रोद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य मी लेखी पत्राद्वारे मागणी करत सदर वर्ष राजर्षी शाहू महाराजांचे जन्म शताब्दी वर्ष म्हणून साजरे होत असताना छत्रपती शाहू मिल येथील स्मारकाचा कामास सुरवात व्हावी, अशी अपेक्षा समस्त शाहू प्रेमी आणि कोल्हापूर वासियांकडून व्यक्त होत असल्याबाबत कळविले होते. त्या अनुषंगाने मा.मंत्री, वस्त्रोद्योग विभाग यांनी सचिव, वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन यांना “कॅबिनेटसाठी प्रस्ताव मागवावा” असे दि.०५.०२.२०२५ रोजी निर्देश दिले होते. यासह या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोल्हापूर येथील छत्रपती शाहू मिल येथे मंजूर राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारून परिसर सुशोभित करण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रस्ताव तात्काळ मागवून घेवून त्यास महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२६ मध्ये निधीची तरतूद करावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली होती, अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, सद्यस्थितीत वस्त्रोद्योग विभागाने स्मारकाबाबत सर्वसमावेशक बनवलेला आहे. सदरचा आराखडा कोल्हापुरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर सादर केला जाणार आहे. त्याबाबतची बैठक लवकरच वस्त्रोद्योग विभाग बोलवणार असून यानंतर हा प्रस्ताव शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे सादर होणार असल्याने, राजर्षी शाहू मिल येथे राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक होण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल पडले असल्याची माहिती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
