कोल्हापूर : प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM-KMY) अंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी ९ ऑगस्ट २०१९ पासून सुरू असून पात्र अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज पूर्ण करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नामदेव परीट यांनी केले आहे.
या ऐच्छिक व अंशदायी पेन्शन योजनेअंतर्गत १८ ते ४० वर्षे वयोगटातील आणि भू-अभिलेखांनुसार २ हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेले शेतकरी पात्र आहेत. लाभार्थ्यांनी वयानुसार दरमहा रुपये ५५ ते २०० पर्यंतचा हप्ता वयाच्या ६० वर्षांपर्यंत भरायचा असून केंद्र शासनाकडून तितकीच रक्कम पेन्शन फंडात जमा केली जाणार आहे. ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यास दरमहा रुपये ३ हजार निश्चित पेन्शन मिळणार आहे.
नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी सामाईक सुविधा केंद्र (CSC) मार्फत https://www.pmkmy.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करताना आधारकार्ड, बँक पासबुक व मोबाईल क्रमांक आदी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.
अधिक माहितीसाठी नजिकच्या सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000
