कागल: मसुरी येथील अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या २०२५ बॅचच्या आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी सहकारी साखर कारखानदारीतील आदर्श मानल्या जाणाऱ्या कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास अभ्यास भेट दिली. त्यांनी कारखान्याच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेतली.
जिल्हा अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने आलेले हे अधिकारी विविध उद्योग समूह, शासकीय कार्यालये तसेच ऐतिहासिक स्थळांना भेट देत स्थानिक प्रशासन आणि उद्योग व्यवस्थापनाची कार्यपद्धती समजावून घेत आहेत.
कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी प्रोजेक्टरद्वारे कारखान्याची स्थापना, प्रगती, तांत्रिक आधुनिकीकरण, शेतकरी-केंद्रित धोरणे आणि समूहातील विविध सहकारी संस्थांच्या कार्याचा आढावा याबाबत माहिती दिली.तसेच सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आर्थिक सक्षमीकरण कसे साध्य होते, याचीही सविस्तर माहिती दिली.
या भेटीदरम्यान प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी कारखाना परिसरातील प्रशासकीय व्यवस्थापनाची पाहणी केली.सहकार क्षेत्रातील यशस्वी मॉडेलचा अभ्यास करण्याची ही संधी लाभल्याबद्दल प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या अधिकाऱ्यांच्या पथकात त्रिलोकसिंह, शिल्पा चौहान, रितिका चीतलांजीया,पुष्पराज खोत, कार्तिके कुमार, श्रावण कुमार रेड्डी, आदित्य अग्रवाल, श्री विशाल व अप्सरा एन यांचा समावेश होता.त्यांनी कारखाना प्रांगणातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी प्रादेशिक सहसंचालक (साखर) गोपाळ मावळे, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी प्रकाश आवटे,जिल्हा उपनिबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे, कोल्हापूर तसेच अॅनिमल हजबंडरी डेप्युटी कमिशनर महेश शेजाल,करवीरचे गटविकास अधिकारी संदीप भंडारे व कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
