कोल्हापूर: भाजपा जिल्हा कार्यालयात आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ११० व्या पुण्यतिथी निमित्य अभिवादन करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा सह-पालकमंत्री मा.माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना कोल्हापूर जिल्हा सह-पालकमंत्री मा.माधुरीताई मिसाळ म्हणाल्या, अखिल भारतीय जनसंघ या राष्ट्रीय राजकीय पक्षाचे अध्यक्ष असताना सुद्धा टोकाच्या साध्या पद्धतीने राहणाऱ्या दीनदयाळजींना पंडित ही पदवी लोकांनी स्वतः हून प्रदान केली. ते शरीराने आपल्याला सोडून गेले, तरी आजही पंडित दीनदयाळ उपाध्याय, त्यांच्या कार्याने, विचारांनी आणि एकात्म मानव दर्शन या तत्त्वज्ञानाच्या रूपाने प्रभावीपणे जिवंत आहेत. गेल्या दशकात त्यांचे एकात्म मानव दर्शन, ‘राष्ट्र जीवनाची दिशा’ या पुस्तकातील विचार, त्यांनी मांडलेली अंत्योदयाची संकल्पना यावर विचारवंतांमध्ये मोठे विचार मंथन सुरू आहे. भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आणि अंत्योदयासाठी म्हणजेच अंतिम व्यक्तीच्या प्रगतीसाठी ‘हर हाथ को काम हर खेत को पानी’ आवश्यक असल्याचे दीनदयाळजींनी वारंवार सांगितले होते. त्यामुळेच रोजगार मेळावे, विविध कृषी विकास योजना यांना वर्तमान सरकारने दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव दिले आहे. त्यामुळे भाजपा पदाधिकारी, नवनिर्वाचित नगरसेवक यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजकार्य करणे आवश्यक आहे. समाजातील सेवाभावी व्यक्ती आणि संस्थांनी दीनदयाळजींच्या विचारांवर अधिक जोमाने काम केल्यास देशात प्रत्येक व्यक्तीचा विकास करण्याच्या दृष्टीने सार्थक प्रगती होईल असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा सह-पालकमंत्री मा.माधुरीताई मिसाळ, आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, महापौर रूपाराणी निकम, गटनेते मुरलीधर जाधव, प्र.का.सदस्य राहुल चिकोडे, सरचिटणीस विराज चिखलीकर, धनश्री तोडकर, हेमंत आराध्ये, अशोक देसाई यांच्यासह नूतन नगरसेवक, नगरसेविका व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
