कोल्हापूरात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून निवडणूक कार्यालयाची पाहणी

कोल्हापूर : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आजच निवडणूककार्यालयांची पाहणी करून तत्काळ कार्यालयीन कामकाज सुरू करावे. सोशल मीडियावर फिरणारे संदेश व व्हिडीओ यावर लक्ष ठेवून मतदारांना प्रलोभन देणारे आक्षेपार्ह साहित्य आढळल्यास तत्काळ कारवाई करावी, अशा सूचना प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.आचारसंहिता लागू झाल्यानंतर आज सकाळी छत्रपती ताराराणी सभागृहात निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

प्रशासक के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ‘सात ठिकाणी असलेल्या निवडणूक कार्यालयांतून संबंधित प्रभागांची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. उमेदवारांचे अर्ज, छाननी, निवडणूक साहित्य वाटप तसेच मतदानानंतर मतदान यंत्रे स्वीकारण्याची कार्यवाही या कार्यालयांतून होणार आहे.त्यामुळे आवश्यक सुविधांची पाहणी करावी. तिथे आवश्यक कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया आजच पूर्ण करावी. ५८४ मतदान केंद्रे असून केंद्रनिहाय याद्यांची तपासणी तातडीने करावी. विभागीय कार्यालये व अतिक्रमण विभागाने सर्व होर्डिंग्ज, बॅनर दुपारपर्यंत काढून टाकावे.

मतदान जनजागृतीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रांगोळी, विविध स्पर्धा, प्रभात फेरी, रेल्वे स्टेशन, बसस्थानके व प्रमुख चौकांत जनजागृती उपक्रम राबवावेत. सायकल-दुचाकी रॅली, फलक तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करावी.’

आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी प्रभागांमधील कोपरा सभा, सभा व रॅलींवर निवडणूक कार्यालये व अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे. वेळोवेळी तपासणी करावी. उमेदवारांच्या खर्चाच्या विवरणाची तपासणी करावी.कार्यालयांमध्ये नागरिकांच्या मदतीसाठी स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करावेत. उमेदवारांना ‘ना हरकत दाखला’ देण्यासाठी राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील हॉलमध्ये स्वतंत्र एक खिडकी व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे.

संबंधित विभागांच्या कर्मचाऱ्यांनी नागरी सुविधा केंद्रात शुल् स्वीकारून ना हरकत दाखले द्यावेत, अशा सूचना के. मंजुलक्ष्मी यांनी केल्या. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, निवडणूक निर्णय अधिकारी रुपाली चौगुले, सुशील संसारे, संदीप भंडारे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी गायगोपाळ, विजय जाधव, उपायुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त उज्ज् दुधाणे, कृष्णा पाटील आदी उपस्थित होते.

 

 

 

 

🤙 8080365706