मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे नाशिक महानगरपालिकेच्या ‘एनएमसी क्लीन गोदावरी बाँड्स’चे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये घंटानादाद्वारे लिस्टिंग करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मंत्र दिला आहे, तो म्हणजे ‘विकास भी और विरासत भी’ आणि 2027 ला होणारा सिंहस्थ कुंभमेळा या मंत्राचे प्रतीक आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन अधिक गतीने विकासकामे करणार आहे, ज्यात पायाभूत सुविधेच्या अंतर्गत ‘क्लीन गोदावरी’ कार्यक्रम हाती घेतला आहे, ज्याने गोदावरी नदीत फक्त प्रकिया केलेलेच पाणी वाहत राहील.
रामायणामध्ये नाशिकचे महत्त्व खूप आहे, कारण प्रभू श्री राम यांचे वनवासातील सर्वाधिक वास्तव्य याच भूमीत होते. त्यामुळे इथल्या सिंहस्थ कुंभमेळ्यालाही खूप महत्त्व आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी उत्तम व्यवस्था करणे आवश्यक आहे, ज्यात नाशिक महानगरपालिकेची खूप महत्त्वाची भमिका असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांसोबतच आता नाशिक महानगरपालिका देखील म्यूनिसिपल बाँड मार्केट हाताळणार याचा आनंद आहे. हा बाँड पारित केल्यानंतर जवळपास ₹26 कोटींचा इंसेंटिव्ह महानगरपालिकेला मिळणार असून केंद्र सरकारने तयार केलेल्या ‘अर्बन चॅलेंज फंड’ला देखील महानगरपालिकेला हाताळता येऊ शकते. तसेच हा बाँड 4 पटीहून अधिक सब्स्क्राईब करण्यात आला ही आनंदाची बाब आहे. याचा नाशिक महानगरपालिकेला फायदाच होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
महाराष्ट्र राज्यात किमान 15 महानगरपालिका अशा आहेत, ज्या आपल्या आढावा पत्रकावर, प्रक्रियेवर आणि आपल्या मानांकनावर काम करून या बाँड मार्केटला हाताळू शकतात.
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त महाराष्ट्र शासनाने अनेक कामे हातात घेतली आहेत आणि सिंहस्थ कुंभमेळ्याचे पावित्र्य राखत ही कामे केली जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी संबंधित अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
