कोल्हापूर दि.०४ : गांधी मैदान ही फक्त छत्रपती शिवाजी पेठेचीच नाही तर संपूर्ण कोल्हापूरवासीयांची आत्मियता आहे. गांधी मैदानाच्या निचरा मार्गात जाणून बुजून अडथळा निर्माण करायचा. स्वत:च्या स्टंटबाजी साठी कोल्हापूरची अस्मिता असणाऱ्या गांधी मैदानाचे नुकसान करायचे आणि नेहमीच या मैदानाचा प्रसिद्धीसाठी वापर करायचा, हेच उद्योग सद्या एका समाजकंटक टोळक्याकडून सुरु आहेत.
गांधी मैदानाचे आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजीचा प्रकार असून, याच टोळक्याकडून गांधी मैदानाच्या विकास कामात खो घालायचे, कंत्राटदारावर काम बंद ठेवण्यासाठी दबाव आणायचा असे उद्योग सुरु आहेत. त्यांचा हा डाव शिवसेना उधळून लावेल, असा इशारा देत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार मा.श्री.राजेश क्षीरसागर साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून गांधी मैदानाच्या उर्वरित कामास महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून रु.२ कोटी ५० लाखांचा निधी वर्ग करण्यात आला असल्याची माहिती दिली.
गांधी मैदानाच्या कामाबाबत गांधी मैदान येथे शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.
याबाबत माहिती देताना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण म्हणाले, कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती असणारे गांधी मैदान ही संपूर्ण कोल्हापूर वासीयांची अस्मिता आहे. शिवाजी पेठेत असलेल्या वरुणतीर्थ तळ्याचे १४ सप्टेंबर १९४३ म्हणजेच सुमारे ७२ वर्षांपूर्वी गांधी मैदानात रुपांतर केले. भौगोलिक दृष्टीने हे पाणी साठण्याचे ठिकाण आहे.
सदर मैदानावर शिवाजी पेठ, मंगळवार पेठ परिसरातील खेळाडू सराव करतात. या मैदानात पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी साचण्याचा प्रकार होत होता. परिसरातील मोठी गटर लाईन या मैदानातून जात असल्याने गांधी मैदानात साचणाऱ्या पाण्यास प्रमुख कारणीभूत आहे. यावर उपाययोजना म्हणून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी रु.४ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर केला आहे. यातून गांधी मैदानात साचणारे ड्रेनेजचे पाणी नव्याने ड्रेनेज लाईन टाकून इतर मार्गाने वळविण्याचे काम सुरु आहे. यामध्ये गांधी मैदान गेट (न्यू कॉलेज बाजू) पासून दुधाळी नाला असे सुमारे ८४० मीटर ड्रेनेज लाईनचे काम करण्यात येणार आहे. यामध्ये दिड बाय दिड मीटर चे मोठे आर.सी.सी चॅनेल बांधकाम होत आहे. सद्यस्थितीत गांधी मैदान गेट ते साकोली कॉर्नर परिसरापर्यंतचे ३८० मीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित अंदाजे ४५० मीटरच्या कामास महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून रु.२ कोटी ५० लाखांचा निधी काल दि.०३ सप्टेंबर २०२५ रोजी वितरीत करण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यात या मैदानात असणारी साठणाऱ्या पाण्याचा निचरा करणारी मूळ ड्रेनेज/ गटरची लाईन जाणूनबुजून बंद करण्याचा विकृत प्रकार या परिसरातील काही समाजकंटकाकडून केला जात आहे. यामुळे गांधी मैदानात पुन्हा पाणी साचून मैदानाचे नुकसान करण्याचा डाव आखला जात आहे. गांधी मैदानातील साचलेल्या पाण्याचा निचरा सफाई करताना कोल्हापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांनाही सदर पाण्याचा मार्ग गाद्या, उशा, सिमेंट पोती टाकून पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा बुजविण्याचा प्रकार मुद्दामहून केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत संबधित कोल्हापूर महानगरपालिकेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परंतु, आमदार राजेश क्षीरसागर यांना बदनाम करण्यासाठी जनतेमध्ये संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. गांधी मैदानाबाबत सातत्याने घडणाऱ्या या घटनेमुळे हजारो खेळांडूचे नुकसान होत असून, शासकीय मालमत्तेचेही नुकसान होत आहे. तसेच शहरात अशांतता व संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये शकुनीमामा असणाऱ्या टोळी प्रमुखावर आणि टोळीवर कारवाई करावी अशी मागणीही शिवसेनेच्या वतीने जुना राजवाडा पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे.
आमदार मा.श्री.राजेश क्षीरसागर यांनी निधी आणला. हे काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी महानगरपालिका आणि कंत्राटदार यांच्यावर आहे. कंत्राटदार कुणाच्या राजकीय दबावाला बळी पडून कामात दिरंगाई करत असले तर त्याच्यावरही कारवाई करण्याच्या सूचना आमदार मा.श्री.राजेश क्षीरसागर यांनी मा.आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका यांना दिल्या आहेत. असे असताना फक्त बदनामी करून बातम्या प्रसिद्ध करण्यासाठीच स्टंटबाजी केली जात आहे. येणाऱ्या निवडणुकीत या स्टंटबाजाला जनताच उत्तर देईल. गांधी मैदानाची दुरावस्था थांबविण्यासाठी शिवसेनेने ज्या प्रमाणे निधी दिला. त्याचप्रमाणे शिवसेनाच हे काम पूर्ण करून घेईल. ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर मैदानात पाणी साठण्याचे प्रमाण नक्कीच बंद होणार आहे. त्यामुळे कामाच्या आडवे येणाऱ्या शकुनीमामा आणि स्टंटबाज टोळक्यालाही लवकरच स्वप्नपूर्ती झालेली पहायला मिळेल, असा उपहासात्मक टोलाही जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी लगावला.
गांधी मैदानाला निधी द्यावा अशी मागणी समस्त शिवाजी पेठेच्या वतीने आमदार राजेश क्षीरसागर यांना करण्यात आली होती. त्यानुसार तात्काळ त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व सद्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेबांच्याकडून एकूण रु.४ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर केला. त्यातील पहिल्या टप्यातील अडीच कोटींच्या निधीतून निम्मे काम पूर्ण झाले आहे. परंतु, गांधी मैदानाचा महीसा बनू पाहणाऱ्या रविकिरण इंगवले यांनी गांधी मैदानासाठी निधी आणल्याची बॅनरबाजी केली होती. पेठेच्या गल्ली – बोळात हे बोर्ड लावले होते. त्या निधीतून काय काम झाले हे त्यांनी जाहीर करावे. बॅनरबाजी केलेला निधी कुणाच्या घशात घातला? हेही समस्त जनतेपुढे जाहीर करावे.चर्चेला केंव्हाही या शिवसेना तयार गांधी मैदानाच्या दुर्दशेला कोण जबाबदार आहे. यातील शकुनीमामा कोण हे सगळ्या जनतेला माहित आहे. आमदारांचे काम निधी आणण्याचे आहे. हे काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची आहे. पण, सुरु असलेल्या कामात खो घालायचा स्टंटबाजीसाठी आंदोलने करायची हा एकच उद्योग विरोधकांकडून सुरु आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांनी आणलेल्या निधीतून काम सुरु आहे. गणेशोत्सवानंतर उर्वरित कामही सुरु होईल. विरोधकांनी या विषयी चर्चेला यावे असे आवाहन केले असेल तर त्यांना चर्चेला केंव्हाही या शिवसेना तयार असल्याचे खुले आव्हान दिले. यासह गांधी मैदानाच्या दुरावस्थेला प्रशासन जबाबदार असून, मा.आयुक्तांनी या ठिकाणी भेट घ्यावी. पाण्याचा निचरा होणाऱ्या ठिकाणीच जाणीवपूर्वक नळे ठेवण्यात आले आहे. दगड- मातीचे ढिगारे कोणी ओतले? महापालिका वरिष्ठ अधिकारी बोलवूनही आरोग्य अधिकारी येथे फिरकत नाहीत? त्यांच्यावर कोणाची दडपशाही सुरु आहे? या सर्व प्रकरणाची चौकशी मा.आयुक्तांनी करावी, अशी मागणीही यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी केली.
या पत्रकार परिषदेस शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, रुपेश इंगवले, सचिन राऊत, निलेश गायकवाड, कपिल सरनाईक, युवासेनेचे प्रसाद चव्हाण, पियुष चव्हाण, शैलेश साळोखे, शुभम शिंदे, मिलिंद साळोखे, विशाल बोंगळे आदी उपस्थित होते.