शक्तीपीठ विरोधात स्वातंत्र्यदिना दिवशी बारा जिल्ह्यातील ज्या शेतामधून शक्तिपीठ जातोय, त्या शेतामध्ये तिरंगा झेंडा लावण्यात येणार

कोल्हापूर:- शक्तीपीठ महामार्ग विरोधात 15 ऑगस्टला अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. ज्या शेतातून शक्तिपीठ जात आहे त्या शेतात तिरंगा झेंडा लावून शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नकोच असा संदेश सरकारला देण्यासाठी, तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात हे अभिनव आंदोलन करण्याचा निर्णय शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 12 जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य दिना दिवशी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

 

शक्तीपीठ महामार्ग विरोधात, आज शनिवारी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची बैठक आयोजीत करण्यात आली होती. शक्तीपीठ विरोधातील बारा जिल्ह्यांमधील लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर शेतकरी या बैठकीसाठी ऑनलाइन सहभागी झाले होते. या बैठकीत बोलताना अनेकांनी आक्रमक भूमिका मांडली. शक्तीपीठ महामार्ग आमच्या शेतात नको हा संदेश देण्यासाठी येत्या १५ ऑगस्टला शेतातच तिरंगा झेंडा लावून तिरंगा झळकतोय आमच्या शेतात.. शक्तीपीठ नको आमच्या वावरात हे अनोखे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वातंत्र्यदिनी शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या शेतात बाराही जिल्ह्यांत शेतातच मेळावे घेण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. या बैठकीला खासदार शाहू छत्रपती, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार अमित देशमुख, आमदार कैलास पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार विनायक राऊत, आमदार अरुणआण्णा लाड, माजी आमदार वैभव नाईक, नंदाताई बाभुळकर, महेश खराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शक्तीपीठ बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली.

यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, स्वातंत्र्यदिनी शक्तीपीठ महामार्गापासून शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळावे यासाठी शेतातच तिरंगा लावून हा शक्तीपीठ महामार्ग आमच्या वावरात नको हे सरकारला ठणकावून सांगूया. असे आवाहन त्यांनी केले. ८६ हजार कोटींचा शक्तीपीठ महामार्ग आता १ लाख ६ हजार कोटींवर गेला आहे. सरकार हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न करत असले तरी आम्ही तो होऊ देणार नाही. या बदलात राज्यात ज्या ठिकाणी रस्ते नाहीत त्या ठिकाणी रस्ते करा शेतकऱ्याला कर्जमाफी द्या अशी भूमिका आमदार सतेज पाटील यांनी मांडली.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी, देशातील पिकाऊ जमिनीचे क्षेत्र कमी होत आहे. अशा काळात जमीन वाचणवे काळाची गरज असल्याचे सांगितले. शक्तीपीठ महामार्गा विरोधात उभे राहून आपण खऱ्या अर्थाने जमिनीला स्वातंत्र्य करत आहोत. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी शेतामध्येच मेळावे घेऊन या महामार्गाविरोधात लढा उभारुया. असे त्यांनी सांगितले.
आमदार अमित देशमुख यांनी,
शक्तीपीठ विरोधात हिवाळी अधिवेशनादरम्यान धडक मोर्चा काढूया अशी भूमिका त्यांनी मांडली.
आमदार कैलास पाटील यांनी, शक्तीपीठ महामार्ग मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे असे म्हटले जाते. मात्र हा प्रोजेक्ट मुख्यमंत्र्यांसाठी ड्रीम आहे की क्रीम आहे. हे त्यांनाच माहीत. असा टोला लगावला. माजी खासदार विनायक राऊत यांनी, शक्तीपीठ विरोधात संघर्षामध्ये शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतलाय शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा शक्तीपीठ नको. ठेकेदार आणि राज्यकर्त्यांची खिसे भरणारा हा शक्तिपीठ हाणून पाडू. असा इशारा त्यांनी दिला. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील दहा गावांमधून हा महामार्ग जात आहे. मात्र शेतकऱ्यांचा विरोध सरकार आणि जनतेसमोर यावा त्यासाठी पुढील तीन दिवसांमध्ये सह्यांच्या माध्यमातून शक्तीपीठविरोधी आवाज अधिक बळकट करण्याचा प्रयत्न असून हा लढा ताकतीने लढणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दहा गावांमध्ये शेतकऱ्यांच्या सह्यांची मोहीम राबवण्यात येणार असल्याचही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले. यावेळी आमदार अरुण लाड, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्यासह बाराही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. दरम्यान 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये शक्तीपीठविरोधी ठराव तसेच गावागावांमध्ये सह्यांची मोहीम राबवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने बुधवारी 13 ऑगस्ट रोजी देशव्यापी आंदोलन होणार आहे यामध्ये शक्तीपीठ बाधित शेतकरीही मोठ्या संख्येने बिंदू चौक येथे सहभागी होणार आहेत.

🤙 9921334545