मुंबई : राज्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आता कोकणपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी व्यापला आहे. मान्सूनने आठवडाभर राज्यभरात चांगलीच हजेरी लावली असून आता काहीशी उसंत घेतली आहे. मुंबईसह पुण्यात आता पुढील चार दिवस पावसाची ओढ कमी राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान केंद्राने दिलाय. आज तळकोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असून विदर्भात आज पावसाचा जोर चांगला राहणार आहे. उर्वरित भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचंही IMDनं सांगितलं .
हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून छत्तीसगड ओडिसा आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये सध्या मान्सून प्रवास करत आहे .येत्या तीन दिवसात कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे .29 मे ते दोन जून या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि कोकण व गोव्यात काही ठिकाणी तीव्र पावसाची शक्यता आहे . पण बहुतांश ठिकाणी पावसाची उघडीप असेल .