कोल्हापूर: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) या देशातील आघाडीच्या संशोधन संस्थेमधील संशोधकांसमवेत काम करण्याची संधी शिवाजी विद्यापीठातील संशोधकांना लाभणार आहे, ही गौरवाची बाब आहे. भविष्यात हे संबंध अधिक दृढतर होण्याच्या दृष्टीने विद्यापीठातील संशोधकांनी गांभीर्यपूर्वक कार्य करावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.
भारतीय विद्यापीठांची संशोधन व विकासाची क्षमता वाढवण्यासाठी केंद्राने स्थापित केलेल्या अनुसंधान नॅशनल रिसर्च फौंडेशन (ANRF) यांच्या अंतर्गत अत्यंत महत्त्वाकांक्षी पेअर (PAIR)च्या ‘हब-अँड-स्पोक’ उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठ देशातील आघाडीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर यांच्याशी ‘स्पोक’ म्हणून जोडले गेले आहे. या प्रकल्पामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स व तं६ज्ञान, रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, पदार्थविज्ञान, संगणकशास्त्र, संख्याशास्त्र, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट, गणित आणि युसिक या विभागांतील १८ संशोधक काम करणार आहेत. या संशोधकांचा आज विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिर्के पुढे म्हणाले, शिवाजी विद्यापीठामध्ये संशोधन प्रकल्पांवर काम करण्याचा शिरस्ता पदार्थविज्ञानाचे प्रा. एस.एच. पवार यांनी निर्माण केला. माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी संशोधन विकासासाठी आवश्यक पर्यावरण आणि शिस्त निर्माण करून महत्त्वाचे बीजारोपण केले. त्याची फळे गेल्या दशकभरापासून आपणास मिळत आहेत. त्यानंतरच्या कालखंडात विविध विभागांतील अत्यंत वरिष्ठ संशोधकांनी विद्यापीठाचे नाव जगभरात उंचावले. मटेरियल सायन्समध्ये तर अद्भुत म्हणावे असे काम आपण केले. त्यामुळे आयआयएससीसोबत अॅडव्हान्स्ड मटेरियल सायन्सविषयक प्रकल्पावर काम करण्याची संधी आपल्या संशोधकांना मिळाली आहे. या संशोधकांना प्रकल्पासाठी आवश्यक ते पाठबळ उपलब्ध करण्यास विद्यापीठ तत्पर असेल. आपणा सर्वांमुळे विद्यापीठाला मोठा लौकिक प्राप्त होणार आहे, याचे भान बाळगून आपण संशोधनकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले.
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठातील संशोधन परंपरेमुळेच आयआयएससीसमवेत काम करण्याची संधी चालून आली आहे. या संशोधकीय सहकार्यामुळे भविष्यात विद्यापीठाचे विविध प्रणालींमधील रँकिंग उंचावण्यासह पेटंटचे व्यावसायीकरण आणि उद्योगांसमवेत काम करण्याची संधी अशा बाबी घडून येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मुख्य संशोधक डॉ. किरणकुमार शर्मा, डॉ. केशव राजपुरे, डॉ. राजेंद्र सोनकवडे, डॉ. नीलेश तरवाळ, डॉ. सागर डेळेकर, डॉ. के.एम. गरडकर, डॉ. अनिल घुले, डॉ. एस.एन. तायडे, डॉ. डी.एस. भांगे, डॉ. जे.बी. यादव, डॉ. के.डी. पवार, डॉ. तुकाराम डोंगळे, डॉ. कविता ओझा, डॉ. के.डी. कुचे, डॉ. एस.डी. पवार, डॉ. एस.एस. सुतार आणि डॉ. के.एस. खराडे या संशोधकांचा ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धैर्यशील यादव यांनी केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.