मुंबई:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची 24 वी बैठक संपन्न झाली. यावेळी गारगाई धरण प्रकल्पासाठी आवश्यक वन्यजीव व पर्यावरण विषयक मंजुरी देण्यासाठी सहमती देण्यात आली. तसेच परिवेष पोर्टलवरील नकाशा प्रमाण मानून व्याघ्र भ्रमंती मार्ग निश्चित करणे आणि या मार्गावरील खासगी जमिनी शेतकऱ्यांच्या स्वेच्छेने संपादित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गारगाई धरण प्रकल्प मुंबईसाठी महत्त्वाचा असून वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी हा प्रकल्प गतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी 844.879 हेक्टर जमिनीच्या वळतीकरण प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. वन विभागाने संबंधित परवाने अटींच्या अधीन राहून तत्काळ मंजूर करावेत तसेच राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे त्रुटीविरहीत प्रस्ताव सादर करून प्रकल्पास मंजुरी मिळवावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
व्याघ्र भ्रमंती मार्गावरील खासगी जमिनी सहमतीने संपादित करून, वनीकरणासाठी वापरण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. तसेच सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील जनाईवाडी येथील वन संपादनाचे शेरे कमी करणे आणि जायकवाडी पक्षी अभयारण्यामध्ये तरंगत्या सौर प्रकल्पास मान्यता देण्यासह इतर महत्त्वाच्या प्रस्तावांनाही बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली.
या बैठकीला मंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्यमंत्री पंकज भोयर, मुख्य सचिव तसेच वन्यविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.