कुंभोज (विनोद शिंगे)
बाहुबली एम.जी.शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे हे होते.
या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाले. कार्यक्रमाचे स्वागत स्मिता निटवे यांनी केले, प्रास्ताविकेमध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान कायदेतज्ज्ञच नव्हते, तर ते शिक्षणाचे महत्त्व जाणणारे एक द्रष्टे समाजसुधारक होते.
त्यानंतर अध्यापिका मनोगतामध्ये सविता पाटील यांनी सांगितले की, शिक्षणाचे महत्त्व अनमोल आहे,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्यासाठी जे स्वप्न पाहिले होते, ते साकार करण्याची जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर आहे. तुम्ही कठोर परिश्रम करून, उच्च शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे नाव उज्वल करावे असे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष मनोगतामध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे यांनी मनुष्य जन्मतः श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो, सर्वांना समान अधिकार आहेत आणि सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. शिक्षणाच्या माध्यमातून आपण आपल्या अंधश्रद्धा आणि चुकीच्या कल्पनांना दूर करू शकतो.भारतीय संविधानाने आपल्याला जे अधिकार दिले आहेत, त्यांचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे, पर्यवेक्षक नेमिनाथ बाळीकाई, व्यवसाय विभागप्रमुख अरुण चौगुले व तांत्रिक विभागप्रमुख रवींद्र देसाई हे होते. तसेच प्रशालेतील अध्यापिका-अध्यापिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार रूपाली गोटूरे यांनी केले तर सूत्रसंचालन जिनमती नांदणे यांनी केले.