कुंभोज (विनोद शिंगे)
श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठ बाहुबलीचे, श्री बाहुबली गुरुकुल स्नातक मंडळ, बाहुबलीचा वार्षिक स्नेहमेळावा २३ फेब्रुवारी रोजी बाहुबली येथे अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे महामंत्री दादासाहेब पाटील होते.
या कार्यक्रमाची सुरुवात परम पूज्य गुरुदेव समंतभद्र महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाले. स्वागत व प्रास्ताविक नेमिचंद पाटील यांनी केले. यानंतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये “प्रवचनसार: जीवन स्वातंत्र्याची कला भाग-३,४” या ग्रंथाचे विमोचन झाले. हा ग्रंथ आर्यिकारत्न १०५ शुद्धोहंश्री माताजी यांनी लिहिलेला आहे. स्नातक मंडळाचे अध्यक्ष बालब्रह्मचारी श्रीधर मगदूम अण्णा यांनी स्नातक मंडळातील सदस्यांना एकत्रित येण्याचे आवाहन केले.
बाहुबली ब्रम्हचर्याश्रम व विद्यापीठाचे संचालक गोमटेश बेडगे यांनी ‘न धर्मो धार्मिकैविना’ या संस्कृत वचनाप्रमाणे धार्मिक जनाच्या द्वारेच धर्मप्रभावना होत असते, असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे महामंत्री दादासाहेब पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेचा चढता आलेख त्याचबरोबर संस्थेची पुढील ध्येये,धोरणे यासाठी आपण एकत्र येऊन कार्य करण्याची गरज असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी डॉ.चंद्रकांत चौगुले, अशोक पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार दीपक अथणे यांनी केले व प्रथम सत्राचा समारोप झाला.
दुसऱ्या सत्रामध्ये स्नातक मंडळींनी स्वतःचीओळख सर्वांना करून दिली त्यानंतर स्नातक मंडळातील गुणीजणांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये बालब्रह्मचारी श्रीधर मगदूम, बलराम महाजन नेमिनाथ बाळीकाई, विजयसेन पाटील व प्रा. पुरंदर चौगुले यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सी.आर.पाटील व्यवस्थापकीय संचालक, मांगीतुंगी यांनी आपल्या मनोगतामध्ये खडतर व प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल परिस्थिती कशी केली याविषयी सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर प्रमुख वक्ते डॉ.चंद्रकांत चौगुले यांनी विसाव्या शतकातील प्रथमाचार्य चारित्र्य चक्रवर्ती १०८ श्री शांतीसागर महाराजांना माणसांची पारख, समाजाप्रती काहीतरी देण्याची वृत्ती व त्यासाठी त्यांची दिव्यदृष्टी कशी होती याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाहुबली संस्थेचे कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील, संचालक गोमटेश बेडगे, अनिल हिंगलजे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.शेवटी आभार रायचंद हेरवाडे यांनी केले तर सूत्रसंचालन नितीन मालगावे व प्रदीप धोतरे यांनी केले.