कोल्हापूर : कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या प्राधिकरणातील समाविष्ट गावांच्या विकासासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाने प्राधिकरणातील समाविष्ट ४२ गावांचा चांगला ‘मास्टर प्लान’ तयार करण्याचे निर्देश मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले. मास्टर प्लान तयार करीत असताना यासाठी अनुभवी व तांत्रिकदृष्ट्या सक्षम संस्थेची मदत घेवून चांगला आराखडा तयार करा. हे नियोजन करीत असताना सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारत्मकता ठेवून आणि जबाबदारीने पुढील दोनशे वर्षांचा विचार करून एक व्हीजन डॉक्यूमेंट तयार करावे अशा सूचनाही दिल्या.
जिल्हाधिकारी यांनी केलेल्या चौकशीच्या अनुषंगाने अहवालातील दोषींवर कारवाई करा, कामे वेळेत पूर्ण करावीत अन्यथा कारवाई करून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना बदला असे निर्देशही आंबेडकर यांनी दिले.
प्राधिकरणाने शहरालगतच्या ४२ गावांमध्ये एक चांगला आराखडा तयार करून कोल्हापूर चांगल्या पद्धतीने उभे करणे आवश्यक होते परंतु फारसे यामध्ये प्राधिकरणाने लक्ष घातल्याचे दिसून येत नाही. यापुढिल बैठकीत प्राधिकरणाने लोकप्रतिनीधी, स्थानिक नागरिक, तज्ञांचा सल्ला घेवून ४२ गावांचे एक चांगले सादरीकरण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात करावे असे निर्देश दिले.
अनाधिकृत बांधकामांबाबत केलेल्या कारवाईबाबतही अहवाल सादर करावा. या ४२ गावातील सार्वजनिक जागांचे नियोजन करून तिथून उत्पन्न कसे घेता येईल यासाठी नियोजन करा. तसेच यापुढे दर महिन्याला प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहे.
या बैठकीला आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी महसूल डॉ.संपत खिलारी उपस्थित होते.