कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातर्फे येत्या शनिवारी (दि. १५) पीएम-उषा पुरस्कृत ‘वास्तविक समस्यांचे सांख्यिकीय अन्वेषण’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. संख्याशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. शशीभूषण महाडिक यांनी ही माहिती दिली.
कार्यशाळा तीन सत्रात होणार असून पहिल्या सत्रामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि डॉ. शशीभूषण महाडिक यांची व्याख्याने होतील. दुसरे सत्र ‘माझे संख्याशास्त्र, माझे जीवन’ हे संवादात्मक असून यामध्ये ज्यांनी सांख्यिकीशास्त्रात यशस्वी कारकीर्द घडवली आहे, अशा अधिविभागाच्या प्रतिष्ठित माजी विद्यार्थ्यांची प्रेरणादायी मुलाखत होईल. तिसऱ्या सत्रात शिवाजी विद्यापीठ संख्याशास्त्र शिक्षक संघटना (सुस्टा) यांच्या संयुक्त विद्यमाने बी.एस्सी. (भाग ३)च्या सांख्यिकीशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी ’सार्वजनिक आरोग्यामधील सांख्यिकीय अंतर्दृष्टी’या विषयावर प्रकल्प सादरीकरण स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांतील प्राथमिक फेरीमधील एकूण ११ प्रकल्पापैकी अंतिम फेरीसाठी पाच प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे.
कार्यशाळेमध्ये शिवाजी विद्यापीठासह कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या कार्यक्षेत्रातील संख्याशास्त्राचे शिक्षक आणि बी.एस्सी. (भाग ३) मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. डॉ. महाडिक यांच्यासह डॉ. सोमनाथ पवार, डॉ. संतोष सुतार, डॉ. एस. व्ही. राजगुरू, डॉ. एस. के. गांजवे, डॉ. एस. एम. पाटील, डॉ. पी.वाय.पाटील, डॉ. एन. एच. जाधव आदी कार्यशाळेसाठी परिश्रम घेत आहेत. आयोजन समितीमध्ये प्रा. पी. एस चौगुले , प्रा. व्ही. व्ही. कोष्टी, डॉ. ए. व्ही. दोरूगडे, डॉ. एस. के. पोवार, डॉ. आर. एच. वळीव, डॉ. (सौ.) एस. पी. पाटील आदी महाविद्यालयीन शिक्षकांचाही समावेश आहे.