बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सावरगांव, ता. आष्टी, जि. बीड येथे ‘श्री मच्छिंद्रनाथ समाधी मंदिरा’चे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
आपला भारत भाविक-भक्तांचा देश आहे. प्रयागराज येथे कुंभमेळा सुरु असून कोट्यवधी भाविक येथे गंगास्नानासाठी येतात, ही संख्या युरोपच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. आपल्यावर शेकडो आक्रमणे झाली तरी भक्ती मार्गामुळे आमची संस्कृती, संस्कार जिवंत राहिले, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वारकरी संप्रदायासह विविध पंथांनी आम्हाला अश्रद्ध होऊ दिले नाही, आम्हाला सश्रद्ध ठेवले. या श्रद्धेतूनच आमच्यामध्ये माणुसकी आलेली आहे. आमच्या इष्टदेवांनीही करुणेचाच संदेश दिला. श्री मच्छिंद्रनाथांच्या दर्शनानेदेखील करुणेचाच संदेश मिळतो.
वर्षानुवर्षांपासून आम्हाला भक्तीचा आणि त्यातून मुक्तीचा मार्ग नाथ संप्रदायाने दाखवला आहे, असे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, श्री मच्छिंद्रनाथ समाधी मंदिराच्या विकास आराखड्याला निधीची कमतरता पडू देणार नाही. नारायण गड विकासाच्या दुसऱ्या टप्प्यासाठीदेखील निधी उपलब्ध करुन देऊ. श्री कानिफनाथ मंदिर ते श्री मच्छिंद्रनाथ मंदिरादरम्यानच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण करु. श्री मच्छिंद्रनाथ मंदिर ते श्री कानिफनाथ मंदिरापर्यंत रोप वेसाठीचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे मांडू आणि पूर्ण करु, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केले.
याप्रसंगी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री पंकजा मुंडे, आ. सुरेश धस, आ. मोनिकाताई राजळे, ह.भ.प. महंत शिवाजी महाराज, ह.भ.प. मधुकर महाराज शास्त्री, ह.भ.प. विवेकानंद शास्त्री, ह.भ.प. बबन महाराज बहीरवाल, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे, गुरुवर्य अशोकनाथ पालवे महाराज, श्री. मस्तनाथ महाराज, श्री. मंदार महाराज, मंदिराचे विश्वस्त व इतर मान्यवर उपस्थित होते.