कोल्हापूरच्या विकासासाठी सर्व मिळून प्रयत्न करू – सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ

कोल्हापूर (पांडुरंग फिरींगे)

  जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणमधून पुढिल आर्थिक वर्ष 2025-26 साठी नियोजन विभागाकडून कळविलेला तात्पुरता नियतव्यय 518.56 कोटींचा असून यामध्ये जिल्ह्यातील यंत्रणांकडील 421.47 कोटींच्या अतिरिक्त मागणीनुसार एकुण 940.03 कोटींच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली. विभागास्तरावरील येणाऱ्या 7 फेब्रुवारीच्या बैठकीत यातील जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी मागणी करणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

 

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला अध्यक्षस्थानी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास, औकाफ राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार शाहु महाराज छत्रपती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत असगावकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार डॉ.अशोकराव माने, आमदार शिवाजी पाटील, आमदार राहूल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे यांच्यासह कार्यान्वयीन यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.वर्ष 2025-26 मध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 518 कोटी 56 लाख रुपये अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली आहे. तर अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) 118 कोटी रुपये तर ओ.टी.एस.पी. योजनेत 2 कोटी 32 लाख रुपयांची अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली आहे.

तीनही घटकांमध्ये अतिरिक्त 421.47 कोटींची मागणी आहे. अशा प्रकारे सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून 1060.15 कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. सन 2024-25 साठी जिल्हा वार्षिक योजनेसाठी (सर्वसाधारण) 567 कोटींच्या अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली होती. यापैकी 230 कोटी 40 लाख रूपये निधी प्राप्त झाला आहे. आज अखेर रक्कम रूपये 114 कोटी 96 लाखांचा निधी खर्च करण्यात आलेला आहे. प्राप्त तरतूदीपैकी 63 टक्के निधी खर्च झाला आहे. सन 2024-25 अंतर्गत अनुसुचित जाती योजनेसाठी (विशेष घटक योजना) 118 कोटींच्या अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली असून, यापैकी 37 कोटी 62 लाख निधी प्राप्त झाला आहे. दिनांक 20 जानेवारी 2025 अखेर 34 कोटी 86 लाख निधी खर्च करण्यात आलेला आहे. प्राप्त तरतूदीपैकी 93 टक्के निधी खर्च झाला आहे. आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्रात 2 कोटी 32 लाख अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली असून, यापैकी 93 लाख निधी प्राप्त झाला आहे. दिनांक 20 जानेवारी 2025 अखेर 30 लाख निधी खर्च करण्यात आलेला आहे. प्राप्त तरतूदीपैकी 32 टक्के निधी खर्च झाला आहे. या सर्व झालेल्या खर्चास यावेळी मंजूरी देण्यात आली. *विकास कामांच्या नियोजनात स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर*जिल्हास्तरावरून अनेक विकासकामांचे नियोजन होते, त्याला मंजुरी दिली जाते. निधीही वर्ग केला जातो. या प्रक्रियेत संबंधित तालुक्यातील आमदार व खासदार यांच्याशी समन्वय ठेवून योजनांना मंजुरी द्या.

त्यांनी दिलेल्या सूचना प्राधान्याने त्या त्या योजनेत समाविष्ट करा अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. तसेच कोणतेही नवीन कामांचे प्रस्तावही सादर करताना ते संबंधित लोकप्रतिनिधींना माहित असावेत. आरोग्य व शिक्षण हे दोन घटक विकास प्रक्रियेला बळ देणारे आहेत. सुदृढ व शिक्ष‍ित समाज निर्माण करण्यासाठी या दोन घटकांना अधिकचा निधी येत्या काळात देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील शाळांबाबत जिल्हा परिषदेने चांगला उपक्रम हाती घेतला आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रही येत्या काळात आधुनिक होत आहेत. समृद्ध शाळा व समृद्ध अंगणवाडी हा उपक्रम येत्या पाच वर्षात जिल्ह्यात राबविण्याचे नियोजन केले जात आहे. तसेच शहरातील 100 वर्षांहून अधिक जुन्या शाळांबाबतही सीएसआर व लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात कामे हाती घेतली जाणार आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. कोल्हापूरच्या विकासातील महत्त्वाचे घटक यात श्री करवीर निवासिनी अंबाबाई विकास आराखडा, श्री जोतिबा विकास आराखडा, कन्व्हेंशन सेंटर आदी महत्त्वाच्या विषयांबाबत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री स्तरावर बैठक लावून सर्व प्रकल्पांना गती देण्यासाठी पुढिल काळात प्रयत्न केले जाणार आहेत. कोल्हापूरच्या विकासासाठी केंद्र व राज्य स्तरावरील अधिकचा निधी कसा आणता येईल याबाबतही चांगले नियोजन केले जाईल असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.*

कोल्हापूरच्या विकासासाठी सर्व मिळून प्रयत्न करू – सह-पालकमंत्री, माधुरी मिसाळ*कोल्हापूर मध्ये अनेक धार्मिक स्थळांचा विकास करताना दक्षिण काशीच्या धर्तीवर तो केला जाईल. सर्व नियोजित कामे मार्गी लावून स्थानिक गरजांच्या अनुषंगाने येत्या काळात विकासकामे केली जातील. कोल्हापूरचा विकास साधत असताना सर्व मिळून प्रयत्न करू असे नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास, औकाफ राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले. यावेळी त्यांनी चंदगड येथील मागणीनुसार पाच एसटी बसेस देण्याचे जाहीर केले. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या मागणीस अनुसरुन मौजे. सैतवडे तालुका गगनबाबडा, मौजे. गोकुळ शिरगाव तालुका करवीर व मौजे. मांगनूर तालुका कागल या तीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधकाम मंजूरीसाठी शासनास मंजुरीसाठी पाठविण्यास या समितीने मान्यता दिली. जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता यांनी सादर केलेल्या आजरा तालुक्यातील मौजे मडिलगे येथील पांडवकालिन रामलिंग मंदिर देवालय परिसरास पर्यटन स्थळास ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आले.