कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)
जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसओपी प्रमाणे आवश्यक कार्यवाही करावी. तसेच जीबीएस रुग्णांची दैनंदिन अद्यावत माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त यांना मंत्री हसन मुश्रीफ यांनी सादर करावी, अशा सूचना दिल्या.
मंत्रालय येथे जीबीएस विषाणूच्या प्रादुर्भाव बाबत झालेल्या आढावा बैठक पार पडली. यावेळी मुंबई वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे आयुक्त राजीव निवतकर, मुंबई वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, आयुषचे संचालक डॉ. रमण घुंगराळेकर आदी प्रत्यक्ष तर सर्व शासकीय वैद्यकीय, आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता तसेच टास्क फोर्सचे अध्यक्ष दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
या विषाणुबाबत नागरिकांमध्ये उपाययोजनांसाठी जनजागृती करण्यात यावी. ज्यामुळे विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आरोग्य यंत्रणांनी देखील आवश्यक औषध पुरवठा आणि साधनसामुग्री उपलब्ध करून घ्यावी, असेही यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
जीबीएस आजाराची सर्वसाधारण लक्षणे :
* अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी किंवा लकवा
* अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा कमजोरी
* जास्त दिवसांचा डायरिया
अशा प्रकारचे लक्षणे जाणवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सरकारी रुग्णालयात तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात.
जीबीएस विषाणुपासून बचावाच्या उपाययोजना :
* पाण्याचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी पिण्याचे पाणी उकळून प्यावे.
* ताजे आणि स्वच्छ अन्न पदार्थांचे सेवन करावे. संसर्ग टाळण्यासाठी शिजवलेले आणि न शिजवलेले अन्नपदार्थ एकत्र ठेवू नये.
* वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.