73 व्या शहरस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात

कोल्हापूर :  महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने 73 व्या शहर स्तरीय सांस्कृतिक स्पर्धा प्रायव्हेट हायस्कूलच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या शानदार सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.मीना सेंडकर उपस्थित होत्या.

 

 

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रशासन अधिकारी आर व्ही कांबळे यांनी केले. दरवर्षी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहरातील प्राथमिक शाळांचा शहर स्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतो. यामध्ये शाळांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असणाऱ्या विविध गुणदर्शन व कौशल्यांचा विकास करण्याची संधी या निमित्ताने मिळत असते. या स्पर्धेचे आयोजन प्रशासक के.मंजूलक्ष्मी व उप-आयुक्त साधना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.मीना सेंडकर यांनी बोलताना कोल्हापूर ही संस्कृतीचे माहेरघर व नाविन्याची सुरुवात करणारे शहर आहे. इथून सुरू झालेले प्रत्येक क्षेत्रातले नाविन्य पुढे राज्यभर पसरते असे नमूद करुन विद्यार्थी व शिक्षकांची कौतुक केले.

 या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षक यांची परिश्रम व कौशल्य प्राधान्याने जाणवले या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून ख्यातनाम मधुसूदन शिखरे सृष्टी बकरे व गार्गी निंबाळकर उपस्थित होते. या बहारदार कार्यक्रमाचे सादरीकरण करून बाल कलाकारांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

 या स्पर्धेतील विजेत्या शाळांतील लहान गटामध्ये प्रथम क्रमांक महापालिकेच्या लक्ष्मीबाई कृ.जरग विद्यालय, द्वितीय क्रमांक नेहरूनगर विद्यालय, तृतीय क्रमांक टेंबलाईवाडी विद्यालय व उत्तेजनार्थ मोरे कॉलनी येथील राजे संभाजी विद्यालयाने पटकाविला. तसेच मोठा गटामध्ये प्रथम क्रमांक जरगनगर येथील लक्ष्मीबाई कृ जरग विद्यालय, द्वितीय क्रमांक टेंबलाईवाडी विद्यालय, तृतीय क्रमांक नेहरू नगर विद्यालय व उत्तेजनार्थ ज्योतिर्लिंग विद्यालय यांचा समावेश आहे. या विजेत्यांचा सत्कार करून त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील जाधव यांनी केले तर आभार क्रीडा निरीक्षक सचिन पांडव यांनी मानले.

    या सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी समग्र शिक्षा कडील अधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, बाबासाहेब कांबळे, उषा सरदेसाई, अजय गोसावी, संजय शिंदे, राजाराम शिंदे, शांताराम सुतार, संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र अप्पू गडे, विक्रम भोसले, श्रावण कोकितकर, अर्चना काटकर आदी उपस्थित होते.