कोल्हापूर : सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापूर शहर हाउसफुल बनले आहे. अशातच शहरातील बहुतांश ठिकाणी सिग्नल यंत्रणा बंद अवस्थेत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी नित्याची बाब बनली आहे. त्याचबरोबर शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अनेक बाबी स्पष्टपणे दिसून येत आहेत. शहर वाहतूक शाखेकडे असलेली अनेक बॅरिकेट्स जीर्ण अथवा मोडकळीला आलेली आहेत.
या संदर्भात आमदार अमल महाडिक यांनी शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या समवेत बैठक घेतली. शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी बंद पडलेली सिग्नल यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्याची सूचना केली.
त्यासाठी लागणाऱ्या निधी संदर्भात प्रस्ताव सादर करावा शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर वाहतुकीला अडथळा ठरणारे केबिन्स आणि अतिक्रमण हटवण्याची मोहीम महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने राबवावी अशी ही मागणी केली.
लवकरच योग्य कार्यवाही होऊन कोल्हापूर शहरातील वाहतूक सुरळीत आणि गतिमान होईल.