पूरग्रस्त शेतकर्‍यांनी अनुदानासाठी केवायसी ची पूर्तता तातडीने करावी आ. राहुल आवाडे यांचे आवाहन

कुंभोज(विनोद शिंगे)
नुकत्याच झालेल्या पावसाळ्यात उद्भवलेल्या महापूरामुळे नुकसान झालेल्या इचलकरंजी अप्पर तहसिल व हातकणंगले तालुक्यातील पूरग्रस्त शेतकर्‍यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. परंतु अद्यापही काही शेतकर्‍यांनी केवायसी ची पूर्तता न केल्यामुळे त्यांना अनुदान मिळण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे इचलकरंजी परिसरातील 237 व हातकणंगले तालुक्यातील 963 शेतकर्‍यांनी तातडीने महा ई सेवा केंद्राशी संपर्क साधून आपली केवायसी ची पूर्तता करावी, असे आवाहन आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी केले आहे.

 

 

 

 

पावसाळ्यात आलेल्या महापूरामुळे इचलकरंजी अप्पर तहसिल व हातकणंगले तालुक्यातील अनेक गावातील शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झालेे. या पूरग्रस्त शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे करुन त्यांच्या अनुदानाची रक्कमही निश्‍चित करण्यात आलेली आहे. सदरची रक्कम तातडीने शेतकर्‍यांना मिळावी या संदर्भात आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर सदर अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

हातकणंगले तालुक्यातील 9516 पूरग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे. परंतु त्यापैकी इचलकरंजी अप्पर तहसिल क्षेत्रातील 237 आणि हातकणंगले तालुक्यातील 963 शेतकर्‍यांनी आवश्यक केवायसी ची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे त्यांना अनुदान मिळण्यास अडचण येत आहे. जोपर्यंत केवायसी ची पूर्तता केली जाणार नाही तोपर्यंत अनुदानाची रक्कम मिळणार नाही. त्यामुळे संबंधित शेतकर्‍यांनी तातडीने आपली केवायसी ची पूर्तता करुन घ्यावी म्हणजे अनुदानाची रक्कम तातडीने त्यांच्या खात्यात वर्ग होईल.

यासाठी केवायसी पूर्तता करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. त्याचा लाभ घेऊन संबंधित शेतकर्‍यांनी महा ई सेवा, शाहू सुविधा केंद्र याठिकाणी तातडीने पूर्तता करुन अनुदान मिळण्यात निर्माण झालेली तांत्रिक अडचण दूर करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन आमदार राहुल आवाडे यांनी केले आहे.